सोलापूर : बाळे येथील राजेश्री नगरमधील एन. के. किड्स स्कूलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त महिला पालकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना ॲड. दिपाली गायकवाड यांनी महिलांनी मुलांच्या संगोपनाबरोबरच स्वतःच्या मानसिक आरोग्याकडेही लक्ष देणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. महिला दिनानिमित्त शाळेच्या वतीने महिला पालकांसाठी उखाणे स्पर्धा, लिंबू-चमचा स्पर्धा, संगीत खुर्ची आदी विविध मनोरंजक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांना महिला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्वेता कस्तुरे, हेड शिक्षिका दिपाली कुलकर्णी, अश्विनी शिंगण, पूनम कळसाईत, सेविका संगीता हेगडकर, सुरेखा शिंदे तसेच महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमामुळे महिला पालकांना एकत्र येऊन आनंद साजरा करण्याची तसेच मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याची संधी मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.























