पंढरपूर – उन्हाळ्या मध्ये उन्हापासून त्रास होवू नये यासाठी प्रत्येक वर्षी मंदिर समितीकडून येथील विठ्ठल रुक्मिणीमातेस चंदनउटी पूजा केली जाते. यंदाच्या वर्षी गुढीपाडवा ते मृगनक्षत्रा पर्यंत चंदनउटी पूजा करण्यात येणार आहे. विठुरायाच्या चंदनउटी पूजेसाठी २१ हजार तर रुक्मिणीमातेच्या चंदनउटी पूजेसाठी ९ हजार रुपये देणगी शुल्क आकारण्यात येणार आहे. मंदिर समितीकडून लवकरच चंदनउटी पूजेसाठी नोंदणी करण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती मंदिर समितीच्या सदस्यांकडून देण्यात आली.
उन्हाळ्यामध्ये सुर्यनारायण रौद्ररुप धारण करीत असल्यामुळे येथील तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जाते. यामुळे उकाड्यापासून विठ्ठल रुक्मिणीस त्रास होवू नये यासाठी गेल्या अनेक वर्षापासून विठ्ठल रुक्मिणीस चंदन उटी पूजा करण्याची परंपरा आहे.
विठ्ठल रुक्मिणीमातेच्या चंदनउटी पूजेसाठी लागणारे चंदन दरवर्षी मंदिर समिती कर्नाटकातून खरेदी करीत असते. दरवर्षी गुढीपाडवा ते मृगनक्षत्र निघे (अर्थात ७ जून ) पर्यंत दररोज दुपारी चार वाजता विठ्ठल रुक्मिणीच्या मुर्तीस चंदनउटी केली जाते. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीमातेस शिरा,पोहे, सुकामेवा, कैरीचे पन्हे, लिंबू सरबत यांचा नैवेद्य देखील दाखविण्यात येत असतो. दरम्यान विठ्ठलाच्या चंदनउटी पूजेसाठी यावर्षी २१ हजार रुपये तर रुक्मिणीमातेच्या चंदन उटी पूजेसाठी ९ हजार रुपये इतके देणगी शुल्क मंदिर समितीकडून आकारण्यात आलेले आहे. सध्या मंदिर समितीकडून चंदनउटी पूजेची तयारी सुरु करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी दिली आहे.
चंदनउटी पूजा करण्यासाठी भाविकांकडून अर्ज मागविले जातात. अशा प्रकारे पुजेसाठी अर्ज मागविण्यास लवकरच सुरुवात होणार आहे. यावर्षी गुढी पाडवा १९ एप्रिलला आहे. त्यामुळे गुढी पाडव्या पासून चंदनउटी पूजेस सुरुवात करण्यात येणार आहे.
























