अक्कलकोट – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून चपळगाव आणि बावरकवाडी येथील महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला ‘होम मिनिस्टर: सुंदर, परिपूर्ण घरासाठी’ हा भव्य सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. चपळगाव जिल्हा परिषद गटाच्या कार्यक्षम सदस्या. शांभवीताई सचिनदादा कल्याणशेट्टी यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाचे दिमाखदार उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुमन कुमारप्पा पाटील होत्या . अवंती अभिजीत पाटील व अभिजीत पाटील मित्रपरिवारातर्फे आयोजित या सोहळ्याने संपूर्ण चपळगाव परिसर भारावून गेला होता.
दीपोत्सव संतोषदादा पाटील मराठी विद्यालय प्रांगणात आयोजित या सोहळ्याचा प्रारंभ जिप सदस्या शांभवीताई कल्याणशेट्टी यांच्या हस्ते दीपप्रज्वलाने झाला. यावेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, माता रमाई, ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन आणि स्व. संतोषदादा पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
महिला शक्तीचा जागर:
शांभवीताई कल्याणशेट्टी उद्घाटनपर भाषणात बोलताना शांभवीताई कल्याणशेट्टी म्हणाल्या की, “संसाराची धुरा सांभाळणाऱ्या महिलेला स्वतःसाठी वेळ मिळत नाही. अशा उपक्रमांमुळे महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो आणि त्यांना एक वेगळा आत्मविश्वास प्राप्त होतो. पाटील परिवाराने आयोजित केलेला हा सोहळा महिला सक्षमीकरणाचे एक उत्तम उदाहरण आहे.”
बक्षिसांची लयलूट आणि खेळांची रंगत
प्रसिद्ध सादरकर्ते प्रा. रोहित गुरव यांनी आपल्या खुमासदार शैलीत खेळांची मांडणी केली. उखाण्यांची जुगलबंदी आणि विविध कौशल्यावर आधारित खेळांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या स्पर्धेत सरस्वती तिवारी यांनी प्रथम क्रमांक पटकावत मानाची पैठणी साडी व रेफ्रिजरेटर जिंकले. तसेच द्वितीय क्रमांकाचा एल.ई.डी. टी.व्ही.सौ.साक्षी जाधव तृतीय क्रमांकाचा कुलर .शीतल जाधव यांसह गॅस शेगडी आणि मिक्सर .रेश्मा बाणेगाव व .सावित्री सागरे यांनी पटकावली अशी अनेक बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. ‘लकी ड्रॉ’ ने कार्यक्रमाची उत्कंठा शिगेला पोहोचवली होती.
प्रत्येक भगिनीचा सन्मान आयोजक अभिजीत पाटील आणि . अवंती पाटील यांनी उपस्थित प्रत्येक भगिनीचे स्वागत केले. केवळ विजेत्यांनाच नव्हे, तर सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यासाठी चपळगाव आणि बावरकवाडी परिसरातील हजारो महिलांची उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभिजीत पाटील मित्रपरिवाराने विशेष परिश्रम घेतले.
























