सोलापूर – जिल्हा परिषदेत अर्थ विभागातील कर्मचाऱ्यांना तदर्थ पदोन्नती दिल्या जात असताना इतर विभागांतील पात्र कर्मचाऱ्यांनाही त्याच धर्तीवर पदोन्नतीची संधी देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाने केली आहे. यासंदर्भात महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन देत प्रशासनाचे लक्ष वेधले.
महासंघाच्या म्हणण्यानुसार, अर्थ विभागात लिपिक संवर्गातील कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक तसेच प्रशासकीय अधिकारी या पदांवर तदर्थ नियुक्त्या केल्या जात आहेत. मात्र इतर विभागांतील कर्मचाऱ्यांना अशा प्रकारची संधी मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ग्रामसेवक, आरोग्यसेवक, पर्यवेक्षक, पशुधन पर्यवेक्षक, प्रसार पर्यवेक्षक आदी पदांवरील पात्र कर्मचाऱ्यांनाही तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नती देण्यात यावी, अशी मागणी महासंघाने केली आहे.
यावेळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र देशपांडे, विभागीय सचिव दिनेश बनसोडे, कार्याध्यक्ष सचिन मायनाळ, सहसचिव सुरेश राठोड, लक्ष्मण वंजारी, प्रमोद धनवडे आदी उपस्थित होते.





















