सांगोला – तालुक्यातील नाझरे गावचे रहिवाशी रायाप्पा रामचंद्र पाटील यांच्या राहत्या घराला मंगळवार दि.१० मार्च रोजी शॉर्ट सर्किटने अचानक आग लागली.
यात त्यांचे संपूर्ण घर जळून भस्मसात झाले. या भीषण आगीत कपडे, भांडी, सोने, चांदीसह रोख रक्कम, अन्नधान्य, संसार उपयोगी साहित्य जळून ४० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने घरातील सर्व मंडळी बाहेर पडल्याने मनुष्यहानी झाली नाही. सदर घटनेची माहिती मिळताच पाटील परिवार व ग्रामस्थ यांनी अग्निशामक दलाला पाचारण केले व आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले.
या आगीत कपाटातील साहित्यसह अनेक विद्युत उपकरणे जळून खाक झाली. रायाप्पा पाटील यांचा मुलगा मनोज पाटील यांनी डाळिंब विकून आलेले पैसे घरातील कपाटात ठेवले होते. त्यामुळे पाटील कुटुंब उघड्यावर पडले आहे. सदर घटनेचा पंचनामा मंडलाधिकारी हरिश्चंद्र जाधव, गाव कामगार तलाठी राजेंद्र जाधव, पोलीस पाटील लक्ष्मण बनसोडे यांनी केला.
























