मोहोळ – तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम गफूर चौधरी (घोडेश्वर) यांची तर उपसभापतीपदी उल्का राजकुमार पाटील (नरखेड)यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत मोहोळ तालुक्यात भारतीय जनता पक्षाने १२ पैकी ७ जागा जिंकत सत्ता मिळविली आहे.अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे३, शिंदे सेनेला आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी १ -१ जागा मिळाली आहे.
मोहोळ पंचायत समितीचे सभापती पद इतरमागास प्रवर्गासाठी आरक्षित होते.घोडेश्वर गणातील असलम चौधरी, सावळेश्वर गणातील पार्वती गावडे आणि कामती गणातील कोमल अवताडे हे या पदासाठी इच्छुक होते.मात्र बाजार समितीच्या सभागृहात माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अस्लम चौधरी आणि उल्का राजकुमार पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.त्यानंतर दोघांनी निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले. विरोधकांनी उमेदवारी दाखल न करण्याची भूमिका घेतल्याने दोघांची बिनविरोध झाली.
निवडीनंतर माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश उपाध्यक्ष शंकरराव वाघमारे, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, जिल्हा चिटणीस महेश सोवनी यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.


























