सोलापूर : येथील सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये बुधवारी (दि. ११ मार्च २०२६) सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांचा ग्रॅज्युएशन डे उत्साहात साजरा करण्यात आला. लहानग्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या या कार्यक्रमाला पालक व शिक्षकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागतपर भाषणाने झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. ग्रॅज्युएशन गाऊन व कॅप परिधान करून विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने मंचावर येत प्रमाणपत्रे स्वीकारली. हा क्षण पालक व शिक्षकांसाठी अभिमानाचा आणि भावनिक ठरला.
या कार्यक्रमास सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव तसेच सिंहगड इन्स्टिट्यूट, केगाव, सोलापूरचे कॅम्पस डायरेक्टर मा. संजय नवले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत परिश्रम, जिज्ञासा आणि आत्मविश्वासाच्या जोरावर प्रगती साधण्याचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला प्राचार्या शाहीन शेख, उपप्राचार्य प्रकाश नवले तसेच पर्यवेक्षिका सारिका चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
शाळेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या प्रयत्नांचे पालकांनी कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी छायाचित्रण आणि आनंदाच्या वातावरणात हा सोहळा अविस्मरणीय ठरला.

























