धाराशिव – व्ही.पी एज्युकेशनल कॅम्पस, छत्रपती संभाजीनगर रोड, धाराशिव येथे भैरवनाथ निसर्ग मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील व करण प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरज ननवरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून धाराशिवच्या नूतन नगराध्यक्षा नेहा राहुल काकडे, डॉ. दिपाली इंगळे तसेच सामाजिक कार्यकर्त्या भाग्यश्री मते यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात महिलांच्या शिक्षणाचे महत्त्व, स्वावलंबनाची गरज आणि समाजाच्या प्रगतीत महिलांची भूमिका अधोरेखित केली. महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येऊन शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात आपले योगदान वाढवावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी महाविद्यालयातील महिला प्राध्यापकांचा विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी महिलांच्या सन्मान, समानता आणि सक्षमीकरणाचा संदेश देत समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील महिला प्रतिनिधी,महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. फिजा पठाण यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. राजेंद्र नागरगोजे यांनी केले.


























