माढा – तालुक्यातील सीना नदी काठच्या खैराव कुंभेज सह इतर गावांमध्ये ट्रॅक्टरच्या साहाय्याने अवैध वाळू उपसा होत असल्याचे महसूल कर्मचाऱ्यांना माहिती मिळाल्याने त्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण व शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास घडली आहे. या संदर्भात स्वप्निल कोंडगुळे (तलाठी खैराव) यांनी माढा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवली आहे. या फिर्यादीचा तपशील असा
१२मार्च रात्री ११.३० च्या सुमारास मी व माझे सहकारी लक्ष्मण मोघल (तलाठी उंदरगाव), लक्ष्मण शेलार (तलाठी कुंभेज), विकास कांगणे (तलाठी रिधोरे) आम्ही आमच्या खाजगी दोन मोटार सायकलवरुन माढा तहसिलदार आदेशाप्रमाणे अवैध वाळु उत्खननावर कार्यवाही करण्यासाठी मौजे खैराव-कुंभेज-वाकाव व तेथुन पुढे उंदरगाव येथे सीना नदीपात्रात नाईकवाडे वस्तीलगत काही इसम अवैध वाळु उत्खनन करुन ट्रॅक्टरमध्ये भरत असताना दिसले.
आम्ही आल्याचे पाहुन त्यांचेपैकी एकाने टाटा कंपनीची एमएच १४ सीके ५४९१ हि गाडी आडवी लावली त्यावेळी आम्ही त्यांना महसुल विभागाचे कर्मचारी आहोत आम्ही अवैध वाळू उपसा विरोधी कारवाईसाठी आलो आहे असे सांगितले असताना त्यांनी आमचे काही न ऐकता ट्रॉलीमध्ये भरलेली वाळु तेथेच जागेवर खाली करुन ट्रॅक्टर ट्रॉलीसह पळून जाउ लागले ते पाहून मी व विकास कांगणे यांनी मोटार सायकलने ट्रॅक्टरचा पाठलाग करत केवड मार्गे मानेगावच्या दिशेने निघालो अंदाजे १ किमी अंतर पाठलाग केल्यानंतर आमचे पाठीमागुन दोन ते तीन मोटार सायकलीवरुन चार ते पाच जण आले त्यामध्ये परमेश्वर नागनाथ राउत, संजय सुरेश भोगे, बाळासाहेब उर्फ सोमेश्वर नागनाथ राउत, प्रविण शिवाजी काळे सर्व रा. मानेगाव येथील होते. त्यांनी त्यांच्या मोटरसायकली आम्हाला आडव्या लावल्या खाली उतरुन परमेश्वर राउत, प्रविण काळे यांनी माझी गच्ची पकडुन लाथाबुक्यांनी मारहाण केली त्यामध्ये माझे गळयाला, डोक्याला व उजव्या हाताला जखम झाली आहे. मला मारहाण होत असल्याचे पाहून माझे सहकारी विकास कांगणे हे मला सोडवण्यासाठी आले असता यांना देखील ढकलुन दिले.
मला मारहाण करीत असतानाचे मी माझ्या मोबाईल मध्ये शुटींग करत असताना कांगणे यांचे मोबाईलवरुन प्रांत कार्यालय येथे फोन करत असताना माझे हातातील दोन्ही मोबाईल घेवुन फेकुन दिले व मला शिवीगाळी करून तु पुन्हा येथे कसा येतो, कसा काम करतो, तुला बघुन घेतो, तुला मारुन टाकतो, असे म्हणुन दमदाटी केली. सदर पळुन गेलेला ट्रॅक्टर हा माझाच होतो असे संजय सुरेश भोगे यांनी आम्हाला सांगितले होते.
असे तक्रारीत म्हटले आहे त्याप्रमाणे माढा पोलीसात भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार१३२, १२१(१),१२६,६२ इत्यादी कलमान्वये गुन्हा संबंधितांवर नोंदवण्यात आला आहे.
या अवैध गोष्टी रोखणार कोण ? का हे असंच चालू राहणार.
माढा पोलीस स्टेशन हद्दीत वीस ते पंचवीस दिवसात घडलेल्या चार घटना.
१)बावी येथे बेकायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्या वर कारवाईस गेलेल्या अन्न व औषध विभागाच्या महिला अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला,२) महसूल कर्मचाऱ्याने कारवाईसाठी आणलेला वाळूचा ट्रक माढा पोलीस स्टेशन समोरून गायब ३) उपळाई बुद्रुक हद्दीतीलशासनाच्या जागेतून १२ लाख रुपये किमतीचा मुरूम चोरीची घटना
४) सीना नदी पात्रात अवैध वाळू उत्खननावर कारवाईस गेलेल्या तालाठ्यांना मारहाण.

























