बार्शी – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर २ उपळाई (ठों) शाळेने विविध उपक्रमाचे आयोजन करुन महिला दिन साजरा केला. या उपक्रमाला महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. सविता भोंग, उपाध्यक्ष श्रीमती योगिता सदावर्ते व प्रमुख अतिथी श्रीमती वर्षा विष्णू मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक अनिल काळे यांनी केले.
त्यानंतर आरोग्य पोषण, स्वच्छता व मार्गदर्शन, मासिक पाळी स्वच्छता जनजागृती या विषयावर आरोग्यसेविका श्रीमती वर्षा विष्णू यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी आहार विहार स्वच्छता, नियमित लसी असाध्य रोगावर नियंत्रण करण्यासाठी कारावयाची उपाययोजना याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. विध्यार्थी सुरक्षाविषयक उपाययोजना मार्गदर्शन व पोक्सो कायदा याविषयी श्रीमती दिपाली गोरे यांनी माहिती दिली.
कायदेविषयक जनजागृती, महिलांचे हक्क,बालविवाह प्रतिबंधक कायदा याविषयी शाळेतील शिक्षिका श्रीमती सुवर्णगौरी शिंदे यांनी मार्गदर्शन केले. शिक्षणाच्या हक्काचा कायदा व समानता कायदा याविषयी शाळेचे मुख्याध्यापक अनिल काळे यांनी मार्गदर्शन केले. शाळेची माजी विध्यार्थीनी कु.ज्ञानेश्वरी पाटील हिनेही शाळेच्या जुन्या आठवणी सांगून महिला दिनाविषयी मार्गदर्शन केले.
शेवटी महिलांच्या संगीत खुर्ची, लिंबू चमचा, मेहंदी व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. प्रत्येक स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाना आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच शेवटपर्यंत उपस्थित राहणाऱ्या महिलांचा लकी ड्रॉ काढून त्यांनाही बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या मेळाव्याला जवळपास १०० महिला व शाळेतील सर्व शिक्षक शाळा व्यवस्थापन समितीच्या महिला सदस्या उपस्थित होत्या. मुख्याध्यापक काळे यांनी आभार मानले.























