अक्कलकोट – तालुक्यातील रुद्देवाडी येथील ओंकार साखर कारखान्याचा गळीत हंगाम रविवारी यशस्वीरित्या संपन्न झाला असून प्रतिकूल परिस्थितीतही कारखान्याने २.६२ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. कारखान्याचे प्रमुख संचालक ओमराजे बाबुराव बोत्रेपाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा करून या हंगामाची सांगता करण्यात आली.
मागील वर्षी हा कारखाना काही काळ चालून बंद झाला होता. तसेच चालू वर्षातही कारखाना जवळजवळ बंद राहण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर आपला ऊस कुठे गाळपासाठी द्यावा हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अशा संकटकाळात ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रेपाटील यांनी कारखाना ताब्यात घेऊन मोठ्या धाडसाने तो सुरू केला. त्यांच्या या निर्णयामुळे परिसरातील शेतकऱ्यांची चिंता दूर झाली.
ओंकार ग्रुपने या हंगामात भागातील शेतकऱ्यांना प्रति टन ३००० रुपये असा सर्वोत्तम ऊसदर देत शेतकऱ्यांच्या विश्वासाला न्याय दिला. ओंकार ग्रुपच्या प्रामाणिक प्रयत्नांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांनीही मोठी साथ दिली. त्यातून चालू गळीत हंगामात कारखान्याने २,६२,८९०.३३७ मे.टन ऊस गाळप केले. तसेच या हंगामात कारखान्याने अपेक्षित साखर उत्पादन : २,६५,५०० क्विंटल, साखर उतारा : ११.५० टक्के, वीज निर्मिती : १.४० कोटी के .डब्ल्यू.एच, वीज निर्यात : ७५ लाख के.डब्ल्यू.एच अशी प्रतिकूल परिस्थितीतही कारखान्याने यशस्वी कामगिरी करत गळीत हंगाम पूर्ण केला.ओंकार ग्रुपच्या नेतृत्वाखाली कारखाना आगामी काळातही शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत, योग्य दर आणि वेळेवर सेवा देण्यासाठी सदैव कटिबद्ध राहील, असा विश्वास यावेळी व्यवस्थापनाकडून व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर विठ्ठल गायकवाड, जनरल मॅनेजर अभयसिंह मानेदेशमुख, सर्व खातेप्रमुख, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी आणि तोडणी-वाहतूक ठेकेदार उपस्थित होते.























