सोलापूर : ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या सभासद फीमध्ये कपात करून ती बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळप्रमाणे नाममात्र एक रुपया करावी अशी मागणी करण्यात आली, जेणेकरून अधिकाधिक चालकांना कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येईल अशी मागणी राज्यसभेच्या नूतन खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. याप्रसंगी खासदार ज्योती वाघमारे यांचा निळ्या रंगाची टोपी, शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
ही घटना राज्यातील ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या कल्याणासाठी महत्त्वाची ठरू शकते, कारण ‘धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ’ अंतर्गत सभासदत्वासाठी सध्या नोंदणी शुल्क आणि वार्षिक फी आकारली जाते. फी कमी झाल्यास अधिक चालक या योजनांचा लाभ घेऊ शकतील.
या निवेदनाची दखल घेत मागणी पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत ही मागणी नेऊन ती मंजूर करून घेण्याचे आश्वासन खा. ज्योती वाघमारे यांनी दिले.
यावेळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद, महासचिव प्रदीप शिंगे, इलियास सिद्दीकी, इमरान शेख, इस्माईल गुंता यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.























