सांगोला – मूळचा जवळा (ता.सांगोला) येथील रहिवासी व सध्या सोलापूर येथे वास्तव्यास असलेल्या ऋषिकेश जाधव याला एप्रिल २०२१ मध्ये कोरोनाच्या काळात इंजिनियरिंगला प्रवेश मिळाला होता. परंतु नियमित कॉलेज बंद झाल्यामुळे ऑनलाईन शिक्षणासाठी त्याला लॅपटॉपची गरज होती.
वडिलांचे छत्र हरवलेल्या ऋषिकेशची आई किरकोळ कामे करत असल्याने तो लॅपटॉप घेऊ शकत नव्हता. त्यावेळी त्याने सांगोला शहरातील हभप.सुभाष लऊळकर आणि माजी नगरसेवक अरुण काळे यांच्यामार्फत आपुलकी प्रतिष्ठानशी संपर्क साधल्यानंतर प्रतिष्ठानने लोकवर्गणी जमा करून त्याला तीन दिवसात लॅपटॉपची मदत केली होती. त्या मदतीची जाणीव ठेवून आपुलकी प्रतिष्ठान विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ऋषिकेश जाधव व त्याची आई यांनी रविवार दि.१५ मार्च रोजी प्रतिष्ठानच्या कार्यालयाला भेट देऊन नोकरीची गोड बातमी देऊन सर्वांना मिठाई दिली. तसेच प्रतिष्ठानच्या सुरू असलेल्या सामाजिक कार्याला ३ हजार रुपये देणगी दिली. यावेळी ऋषिकेश व त्याच्या आईचा प्रतिष्ठान तर्फे सन्मान करण्यात आला. याप्रसंगी आपुलकीचे अध्यक्ष राजेंद्र यादव, सचिव संतोष महिमकर यांचेसह सदस्य उपस्थित होते.
इंजिनिअरिंग शिक्षणासाठी आपुलकीने केलेली लॅपटॉपची मदत मी कधीच विसरू शकणार नाही. पुण्यात आय.टी.कंपनीत नोकरी मिळाली तेव्हा प्रथम आपुलकीची आठवण झाली. प्रतिष्ठानच्या कार्याला सुरुवात म्हणून ३ हजार रुपये देणगी देत असून यापुढेही आपुलकीच्या सामाजिक कार्यात आपण सहभागी होऊ.
– ऋषिकेश जाधव


























