सोलापूर – IEDSSA यांच्या वतीने आयोजित महिला गटातील राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धा दि. १३ मार्च २०२६ रोजी पुणे येथील सणस क्रीडांगणावर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. राज्यभरातील विविध महाविद्यालयांतील खेळाडूंनी या स्पर्धेत उत्साहाने सहभाग नोंदविला.
या स्पर्धेत श्री सिद्धेश्वर वूमेन्स पॉलिटेक्निक, सोलापूर येथील विद्यार्थिनींनी उत्कृष्ट क्रीडाप्रतिभेचे दर्शन घडवत तीन पदकांची कमाई करून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला. विद्यार्थिनींनी जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी करत प्रेक्षकांची मने जिंकली.
२०० मीटर धावणे प्रथम,१०० मीटर धावणे द्वितीय व ४×१०० मीटर रिले द्वितीय या क्रीडा प्रकारांमध्ये महाविद्यालयाला एकूण ३ पदके मिळाली. या स्पर्धेत महाविद्यालयाच्या संघातून कु. श्रेया चव्हाण, कु. वैष्णवी भानुमते, कु. तेजश्री वसेकर, कु. प्रियांका कांबळे व कु. सरस्वती चिकने यांनी उत्साहाने सहभाग घेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, पुणे येथील प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित केले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. धर्मराज काडादी यांनी विद्यार्थिनींचे विशेष कौतुक केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. गजानन धरणे व गव्हर्निंग बॉडीचे सदस्य श्री. आर. एस. पाटील, श्री. सी. बी. नाडगौडा, श्री. मल्लिनाथ मसरे व श्री. काशिनाथ ढोले यांनीही विजेत्या विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.
विद्यार्थिनींना क्रीडा विभाग प्रमुख प्रा. स्वयंप्रकाश व्यास तसेच प्रा. शितल सावळगी, प्रा. संग्राम माने, प्रा. रविकिरण पतंगे, प्रा. वैदेही देशपांडे व ऐश्वर्या व्हनमाने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.



















