सोलापूर – राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या अन्यायाविरोधात ठाम भूमिका घेणार असून अशा बेफाम अधिकाऱ्यांना थेट शिक्षण मंत्र्यांसमोर उभे केले जाईल, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी तथा आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनी दिला.
प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित सत्कार समारंभ व ‘ज्ञान मंदिरातील प्रज्ञावंत’ या गौरवग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक-कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर होते.
मंगेश चिवटे पुढे म्हणाले की, समाजातील गंभीर रुग्णांना मदत करण्याबरोबरच शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठीही आपण कटिबद्ध आहोत. शिक्षकांच्या सेवेला संरक्षण मिळावे, तसेच पदोन्नतीमध्ये आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कामासाठी आपल्याला विधान परिषदेत पाठवावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड यांच्या कार्याचा गौरव केला. शिक्षक, कर्मचारी आणि शिक्षण क्षेत्रासाठी त्यांनी आयुष्य समर्पित केले आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून ‘ज्ञान मंदिरातील प्रज्ञावंत’ हा गौरवग्रंथ प्रकाशित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सेवानिवृत्तीनंतरही गायकवाड यांचे कार्य संघटनेसाठी प्रेरणादायी ठरेल, असेही ते म्हणाले.
सत्काराला उत्तर देताना प्राचार्य गायकवाड यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण प्रसारक मंडळ आणि बहुजन शिक्षक महासंघामुळेच आपण घडलो असल्याचे सांगितले. या संस्थांप्रती आपण सदैव ऋणी राहू आणि पुढेही संघटनेच्या कार्यात सक्रिय राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमात दिलीपराव चौगुले, डॉ. बापूसाहेब अडसूळ, रविकांत गोरे, दत्तात्रय शिंदे, रामण्णा गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर गौरवग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवी देवकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. युवराज भोसले यांनी तर आभार निर्मला मौळे यांनी मानले. या वेळी विविध पदाधिकाऱ्यांचा तसेच सेवानिवृत्त सदस्यांचाही सन्मान करण्यात आला.


























