सोलापूर – शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन सकाळी व सायंकाळी ६ ते ९ या वेळेत सिंगल फेज वीजपुरवठा सुरू ठेवावा, अशी मागणी समाजकल्याण समितीचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली आहे. सध्याच्या वीजपुरवठा वेळापत्रकामुळे शेतकरी, विद्यार्थी व दुग्ध व्यवसायिकांना मोठ्या अडचणी येत असून, या वेळेत वीज उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
सध्या शेती पंपासाठी थ्री फेज वीज सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत पुरविली जाते. त्यानंतर सायंकाळी ५ ते ६ या कालावधीत अल्प वेळ सिंगल फेज वीज उपलब्ध होते. सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत सिंगल फेज वीज पूर्णतः बंद ठेवण्यात येते. रात्रपाळीत थ्री-फेज वीज रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत दिली जाते. परंतु, त्यानंतर सकाळी ६ ते ९ या वेळेत सिंगल फेज वीज उपलब्ध नसते. या परिस्थितीमुळे वाड्या-वस्तीवर राहणारे शेतकरी, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिक यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
सध्या परीक्षेचा कालावधी सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरित परिणाम होत आहे. दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना सकाळी व सायंकाळी आवश्यक असणाऱ्या कामांमध्ये दुधाच्या मशीन जोडणे, कुट्टी करण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत. याबाबत निवेदनात सविस्तर माहिती देऊन मागणी करण्यात आली आहे.
सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून, सकाळी व सायंकाळी ६ ते ९ या वेळेमध्ये शेती पंपासाठी सिंगल फेज वीजपुरवठा सुरू ठेवण्याबाबत संबंधित विभागास आवश्यक त्या सूचना द्याव्यात, असे निवेदनात म्हटले आहे.सध्याच्या वीजपुरवठा वेळापत्रकामुळे शेतकरी, विद्यार्थी व दुग्ध व्यवसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, या संदर्भात तातडीने योग्य निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

















