सोलापूर – श्रीराम जन्मोत्सवानिमित्त अयोध्या प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेले ह.भ.प. बळीराम जांभळे महाराज यांचे गुलालाचे कीर्तन भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमात रामनामाच्या गजरात आणि गुलाल उधळून भक्तांनी अनोख्या भक्तिभावाने सहभाग नोंदविला. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून नगरसेविका श्रीदेवी फुलारे, स्वीकृत नगरसेवक मनीष केत, उत्तरा बचुटे बर्डे आदींची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेची आरती करण्यात आली. याकार्यक्रमाने परिसरात भक्तिमय आणि उत्साही वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, कीर्तनात महाराजांनी धर्माचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, धर्म म्हणजे प्रत्येकाने नीतिमत्तेने वागणे, सत्य बोलणे आणि समाजाप्रती जबाबदारीने आचरण करणे होय. जेव्हा समाजात अधर्म वाढतो, तेव्हा त्या अधर्माचा नाश करण्यासाठी प्रभू श्रीरामांना अवतार घ्यावा लागतो. संत आणि देव हे अशाच काळात मार्गदर्शनासाठी अवतरतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
“कुठल्याही परिस्थितीत सत्य आणि न्यायाच्या बाजूने उभे राहणे आवश्यक आहे. प्रत्येकाच्या मनामनात रामजन्मोत्सव साजरा झाला, तरच समाजात खऱ्या अर्थाने धर्माची स्थापना होईल,” असा संदेशही त्यांनी यावेळी दिला. या कार्यक्रमाला हिंदू रक्षक मित्र मंडळाचे संस्थापक शेखर फंड आदींसह मंडळाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.















