किनवट – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटनात्मक बांधणीला बळकटी देण्यासाठी पक्षाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, किनवट तालुक्यातील परसराम नाईक तांडा येथील तडफदार कार्यकर्ते श्री. सचिन माधवराव जाधव (नाईक) यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ‘संघटक सचिव’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीचे अधिकृत पत्र आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या स्वाक्षरीने हे नियुक्ती पत्र निर्गमित करण्यात आले आहे. सचिन जाधव यांची ही नियुक्ती २५ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आली असून, त्यांच्यावर आता प्रदेश पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
या नियुक्ती पत्रात नमूद केल्यानुसार, पक्षाच्या वाढीसाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ध्येयधोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सचिन जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभेल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी व्यक्त केला आहे.
“पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवून ही मोठी जबाबदारी सोपवली आहे, त्याबद्दल मी प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे साहेब आणि आदरणीय नेतृत्वाचा ऋणी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि पक्ष संघटनेच्या मजबुतीसाठी मी अहोरात्र प्रामाणिकपणे काम करेन. कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघटन वाढवणे हेच माझे मुख्य उद्दिष्ट असेल.”
सचिन जाधव यांच्या निवडीमुळे किनवट आणि माहूर परिसरातून त्यांचे मोठे कौतुक होत आहे. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. या निवडीबद्दल राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
















