दिल्ली : येथे मागील महिन्यात झालेल्या दुसऱ्या ऑल इंडिया पोलीस टी20 क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र राज्य पोलीस संघाने अंतिम सामन्यात आर पी एफ संघाला 91 धावांनी हरवून विजेतेपद पटकाविले असून कर्णधार सुनील पाटील च्या नेतृत्वात खेळलेल्या महाराष्ट्र संघात सोलापूरच्या श्रीकांत लिंबोळेचा समावेश होता.
अंतिम सामना अरुण जेटली स्टेडियमवर खेळविण्यात आला तेव्हा प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्र राज्य पोलीस संघाने निर्धारित 20 षटकात सुनील पाटील, श्रीकांत लिंबोळे, रोहित पोळ, योगेश पाटील यांच्या दमदार फलंदाजीमुळे सर्वोच्च धावगती राखत 251 धावांचा डोंगर उभा केला होता.
252 धावांचे विजय लक्ष गाठताना आरपीएफ संघाने उत्तम सुरुवात केली होती परंतु महाराष्ट्राच्या रोहित बेहरे ने भेदक गोलंदाजी करत 5 बळी मिळविले आणि सामना महाराष्ट्राच्या बाजूने झुकविला. त्याला गोलंदाजी मध्ये योगेश शिंदेने 3 बळी घेत तर यष्टिरक्षक श्रीकांत लिंबोळे याने 4 उत्तम झेल घेत साथ दिली. आरपीएफ संघ 15 षटकात 160 धावांच करू शकला.
अंतिम सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार रोहित बेहेरे तर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून महाराष्ट्र संघाचा कर्णधार रोहित पोळ यांना गौरविण्यात आले.
महाराष्ट्र राज्य पोलीस संघाच्या या कौतुकास्पद कामगिरी बद्दल पोलीस महासंचालक सदानंद दाते, अतिरिक्त महासंचालक मधुकर पांडे, पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश व प्रवीण पडवळ यांनी विशेष अभिनंदन केले. मुख्य प्रशिक्षक रोहन बगाडे, संदेश चव्हाण तसेच निवड समितीचे संतोष कांबळे, दीपक पाटील व नीलेश भोसले यांचे मार्गदर्शन लाभलेल्या महाराष्ट्र संघात असलेल्या सोलापूरच्या पोलिस श्रीकांत लिंबोळेचा प्रशस्ती पत्रक देत विशेष सत्कार सन्मान सोलापूरचे पोलिस आयुक्त एम.राजकुमार यांनी केला. यावेळी पोलीस उपायुक्त IPS हसन गौर व विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, व. पो. नि. बंडगर आदी मान्यवर देखील उपस्थित होते.
संक्षिप्त धावफलक :
महाराष्ट्र : 251/4 (20)
रोहित पोळ नाबाद 71(19) – 10 षटकार, 1 चौकार,
योगेश पाटील 52(25),
सुनील पाटील 45(16),
श्रीकांत लिंबोळे 42(35),
योगेश शिंदे 33
– नवदीप, मनजीत सैनी, हिमांशु वोहरा, अनंत तोमर प्रत्येकी 1 बळी
आर पी एफ : सर्वबाद 160 (15)
नवनीत 46 (19), अनंत तोमर 33, अश्रफ गाझी 24, परदिप भाटि 20, नवदीप 19
– रोहित बेहरे 23/5, योगेश शिंदे 23/3, अमोल तनपुरे पंकज परदेशी प्रत्येकी 1 बळी

















