नवीन नांदेड – भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सिडको-हडको नवीन नांदेड परिसरात विद्युत रोषणाई, स्वच्छता मोहीम व रस्त्यांची तात्काळ डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीचे सम्राट आढाव यांनी सिडकोतील समाज बांधवांच्या वतीने एका निवेदनाद्वारे मनपाचे अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार व मनपाचे महापौर कविताताई मुळे यांच्याकडे दिनांक १ एप्रिल रोजी करण्यात आली.
महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक सिडकोतील मुख्य रस्त्याने काढली जाते. यावेळी हजारो नागरिक अभिवादनासाठी उपस्थित राहतात. त्यामुळे जयंतीपूर्वी परिसराची सुयोग्य तयारी करण्याची मागणी वंचित बहुजन युवा आघाडीचे सम्राट आढाव यांनी मनापाचे आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे दिनांक १ एप्रिल २०२६ रोजी केली आहे.निवेदनात नमूद केल्यानुसार, गुरुवार बाजार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क परिसरात एलईडी फोकस लाईट, विद्युत रोषणाई, स्वच्छता व सुशोभीकरण करण्यात यावे. तसेच लातूर फाटा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व माता रमाई आंबेडकर चौक परिसर रंगरंगोटी करून स्वच्छ करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
यासोबतच वस्ताद लहुजी साळवे नगर, वाघाळा हडको ते सिडको परिसरातील मुख्य रस्त्यांची तात्काळ डागडुजी करून मजबुतीकरण करावे व बंद असलेले सर्व स्ट्रीट लाईट सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सिडको-हडको परिसरातील सर्व बुद्ध विहार व स्मारक परिसरात महानगरपालिकेमार्फत विद्युत रोषणाई करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.भिम जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेसह स्वच्छ व प्रकाशमान वातावरण उपलब्ध करून देण्याची अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

















