पंढरपूर – रयत शिक्षण संस्थेच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी देण्यात येणाऱ्या कर्मवीर पारितोषिकासाठी पात्र ठरलेल्या महाविद्यालयांच्या प्रत्यक्ष तपासणी प्रक्रियेला वेग आला असून, पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयाला मंगळवार, दिनांक ७ एप्रिल रोजी समिती भेट देणार आहे.
या तपासणीसाठी नियुक्त समितीमध्ये चेअरमन म्हणून मा. प्रि. डॉ. साळुंखे एस. टी. (यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सदस्य म्हणून मा. प्रि. डॉ. कदम एल. डी. (डी.पी. भोसले कॉलेज, कोरेगाव), मा. प्रा. पाटील जे. एन. (यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा) आणि श्री. कांबळे एस. आर. (सिनिअर क्लार्क, ऑडिट डिपार्टमेंट, रयत शिक्षण संस्था, सातारा) यांचा समावेश आहे.
संस्थेकडून प्राप्त माहितीनुसार, १५०० पेक्षा अधिक विद्यार्थीसंख्या असलेल्या महाविद्यालयांची प्राथमिक निवड करण्यात आली असून, त्यामध्ये पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचा समावेश आहे. समितीचे अध्यक्ष व सदस्य महाविद्यालयाला भेट देऊन शैक्षणिक, प्रशासकीय तसेच इतर उपक्रमांची सखोल पाहणी करणार आहेत.
तपासणीदरम्यान संस्थेने दिलेल्या प्रश्नावलीनुसार कागदपत्रांची पडताळणी, विविध उपक्रमांचा आढावा आणि एकूण कार्यपद्धतीचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. या अनुषंगाने महाविद्यालय प्रशासनाने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली असून, समितीच्या स्वागताची तयारी पूर्ण केली आहे.
या तपासणीमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेला अधोरेखित करण्याची संधी मिळणार असून, कर्मवीर पारितोषिकासाठी महाविद्यालयाची दावेदारी अधिक बळकट होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
ही माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव यांनी दिली आहे.



















