सोलापूर – जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती संस्कृती सातपुते यांनी आपल्या कार्यकाळाची प्रभावी सुरुवात करत समाजातील वंचित घटकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. सोमवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेतील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीनंतर सातपुते यांनी अधिकृतपणे कामकाज हाती घेतले. यावेळी त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सर्व सभापतींची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.
दरम्यान, पत्रकारांशी संवाद साधताना सातपुते म्हणाल्या की, “समाजकल्याण विभाग हा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रभावी माध्यम आहे. मिळालेल्या पदाला प्रामाणिकपणे न्याय देत प्रत्येक योजना वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील.”यासोबतच विभागातील कर्मचाऱ्यांची कमतरता लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात येणार असून, समाजकल्याण विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुलींची वसतिगृहे तसेच दिव्यांग शाळांमधील सोयी-सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.माजी आमदार राम सातपुते यांच्या सामाजिक कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आपण राजकीय वाटचाल करत असल्याचे सांगत, “मिळालेल्या जबाबदारीला पूर्ण प्रामाणिकपणे न्याय देईन,” अशी ग्वाही सातपुते यांनी दिली.




















