सोलापूर – जिल्हा परिषदेतील नव्याने निवडून आलेल्या सदस्यांना पुढील पाच वर्षांत कामकाज प्रभावी आणि सुरळीतपणे पार पाडता यावे, यासाठी प्रशासनाच्या वतीने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा दि. १६ एप्रिल रोजी जिल्हा परिषद येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.१५ या वेळेत पार पडणार आहे.
या कार्यशाळेत जिल्हा परिषदेमधील सभा पद्धती, कामकाजाचे नियोजन, आदर्श मतदारसंघ उभारणी, निधी तरतूद, विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया, ‘माझी वसुंधरा’ आणि ‘पंचायत समृद्धी’ यांसारख्या महत्त्वाच्या योजनांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. यामुळे सदस्यांना प्रशासनिक प्रक्रिया अधिक सुस्पष्टपणे समजून घेता येणार असून आगामी पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी दिशा मिळणार आहे.
कार्यशाळेत विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.वि.) स्मिता पाटील, यशदा पुणेचे उपसंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पुणे जिल्हा परिषदेचे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती सुरेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश पिंपळनेर, उपसंचालक (रा.ग्रा.वि.सं.) आनंद पुरसवळे तसेच वित्त विषयातील तज्ज्ञ रमेश जाधव हे विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यशाळेमुळे जिल्हा परिषद सदस्यांना केवळ नियम व प्रक्रिया यांची माहिती मिळणार नाही, तर विकासाभिमुख दृष्टीकोन तयार होण्यासही मदत होणार आहे. परिणामी, जिल्हा परिषदेचे कामकाज अधिक परिणामकारक आणि लोकाभिमुख होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

























