सोलापूर : राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या १०० दिवसीय प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान (टप्पा-२) यशस्वी करण्यासाठी सोलापूर प्राईव्हेट हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनच्या वतीने शहर क्षयरोग केंद्रातील १५ क्षयरुग्णांना सहा महिन्यांसाठी पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास सोलापूर प्राईव्हेट हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय मंठाळे, सचिव डॉ. निशिकांत मस्के, सदस्य डॉ. प्रकाश घाटोळे, डॉ. ज्योती चिडगुपकर यांच्यासह एनटीईपी कर्मचारी उपस्थित होते.
शहरात दि. २४ मार्च २०२६ पासून सुरू झालेल्या या अभियानाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक उत्तरदायित्व जपत सोलापूर प्राईव्हेट हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनने हा स्तुत्य उपक्रम राबवला. वितरित करण्यात आलेल्या किटमध्ये मटकी एक किलो, हिरवा मूग एक किलो, सोयाबीन वडी एक किलो, शेंगदाणे एक किलो, गुळ एक किलो, हिरवा वाटाणा १०० ग्रॅम, चणा १०० ग्रॅम आणि खजूर ५०० ग्रॅम यांचा समावेश आहे.
समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, दानशूर नागरिक, स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट क्षेत्रातील संस्था, लोकप्रतिनिधी आणि समाजसेवक यांनी पुढाकार घेत ‘निक्षय मित्र’ बनून क्षयरुग्णांना पोषण आहारासाठी सहाय्य करावे, असे आवाहन यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. राजा येवले (नवी दिल्ली), डॉ. आनंद श्रीधरन (नवी दिल्ली) तसेच शहर क्षयरोग अधिकारी डॉ. अरूंधती हराळकर यांनी केले आहे.

























