सांगोला – केंद्र शासनाच्या सर्वांसाठी घरे या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत घरकुल मंजूर लाभार्थींना राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत मोफत वाळू देण्याचा निर्णय झाला असून सदर निर्णयाची अंमलबजावणी सांगोला तालुक्यामध्ये सुरू झाली आहे.
मेडशिंगी येथील कोरडा नदीपात्रामधून घरकुल लाभार्थीस २ ब्रास प्रमाणे मोफत वाळू वाटप कार्यक्रम सांगोल्याच्या तहसीलदार बाळूताई भागवत, पंचायत समितीच्या सभापती पुनम इंगवले, सहा.गटविकास अधिकारी वसंत फुले या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. मेडशिंगी येथील कोरडा नदीपात्रातील घाटावरून सध्या १४९ लाभार्थींना प्रत्येकी २ ब्रास याप्रमाणे कोटा मंजूर करण्यात आलेला आहे. वाळू वाटप शुभारंभ प्रसंगी प्रत्यक्ष १० लाभार्थींना प्रत्येकी २ ब्रास याप्रमाणे वाळू वाटप करण्यात आली.
या प्रसंगी डॉ.सुदर्शन इंगवले तसेच मेडशिंगी, आलेगाव, वाकी घेरडी येथील सर्व सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, घरकुल लाभार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित असल्याची माहिती पंचायत समितीचे आरोग्य विस्तार अधिकारी मिलिंद सावंत यांनी दिली.





















