जालना – यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक कुटुंबांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत गरजू कुटुंबांची दिवाळी गोड व्हावी आणि त्यांच्या सणाचा आनंद द्विगुणित व्हावा, या सामाजिक भावनेतून भाजपा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका सुलोचना लक्ष्मण गोर्डे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक १४ मधील जवळपास ३०० गरजू कुटुंबांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. या किराणा किटमध्ये साखर, तांदूळ, तूरदाळ, चणाडाळ, खाद्यतेल, पुडा, साबण, सोनपापडी, चहापत्ती, बिस्किटे चिवड्याचे पाकीट असा या किटमध्ये समावेश आहे.
प्रभागात कोणते गरजू कुटूंब आहे, या कुटूंबियांची निलेश गोर्डे मित्रमंडळाकडून नावे काढली. यानंतर या कुटूंबियांना या किट देण्यात आल्या. या उपक्रमासाठी भाजपाचे सदस्य निलेश गोर्डे, अभिजीत भवर, सौरभ भिसे, शिवाजी क्षीरसागर, अविनाश खंडागळे, श्रीराम ढगे, राहुल कोलते, शुभम गोर्डे, कार्तिक गवारे, योगेश शिंदे, अनिकेत पाटील, अभिजित बोहाते आदींनी विशेष परिश्रम घेतले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या कुटुंबांना या मदतीमुळे मोठा आधार मिळाला आहे. सणासुदीच्या काळात गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा या सामाजिक उपक्रमाचे प्रभागातील नागरिकांनी कौतूक केले आहे. ऐन दुष्काळात गरजूवंत कुटूंबियांना दिलेला आधार हा महत्वाचा आहे, असे अनेक कुटूंबियांनी बोलून दाखविले.
सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर
पक्षातील वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली येत्या काळातही विविध सामाजिक उपक्रम राबविण्यावर आपला भर राहणार आहे. समाजातील गरजू आणि वंचित घटकांना शक्य तेवढी मदत करणे, त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना आधार देणे, हेच आपले ध्येय आहे. राजकीय कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत जनसेवेचे कार्य सातत्याने सुरू ठेवणार असल्याची माहिती भाजपाचे सक्रिय सदस्य निलेश गोर्डे यांनी दिली.