सोलापूर – जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात महत्त्वपूर्ण प्रशासकीय बदल करण्यात आला असून नांदेडचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड यांची जिल्हा आरोग्य अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागाला तरुण आणि ऊर्जावान नेतृत्व मिळाल्याची चर्चा सुरू आहे.
सध्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांची नांदेड येथे जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीनंतर डॉ. कोपुरवाड यांच्याकडे सोलापूरच्या आरोग्य विभागाची धुरा सोपविण्यात आली आहे.
डॉ. नवले यांच्या बदलीबाबत प्रशासन व आरोग्य वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या सेवाकाळास काही काळ बाकी असताना त्यांची बदली समकक्ष पदावर किंवा पदोन्नतीसह उपसंचालकपदी होणे अपेक्षित होते. मात्र त्यांना माता-बाल संगोपनसारख्या तुलनेने कमी जबाबदारीच्या पदावर पाठविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, डॉ. सतीश कोपुरवाड हे सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या इतिहासातील सर्वात तरुण जिल्हा आरोग्य अधिकारी ठरल्याची चर्चा आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे विभागात नव्या कार्यपद्धतीची अपेक्षा व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, आषाढी यात्रेच्या तोंडावरच त्यांची नियुक्ती झाल्याने मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आहे. यात्रेच्या काळात लाखो भाविकांच्या आरोग्य सुविधा, आपत्कालीन सेवा, स्वच्छता, रोगप्रतिबंधक उपाययोजना आणि ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवणे, हे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असेल.
सोलापूर जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आरोग्य विभागात हा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे नव्या सीईओंसोबत काम करण्याची संधी डॉ. कोपुरवाड यांना मिळणार असून प्रशासनात नवे समन्वयाचे समीकरण तयार होण्याची शक्यता आहे.
सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे विस्तृत जाळे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, माता-बाल संगोपन योजना, लसीकरण मोहीम, संसर्गजन्य रोग नियंत्रण आणि आरोग्य कर्मचारी व्यवस्थापन या सर्व बाबी प्रभावीपणे हाताळण्याचे मोठे आव्हान नव्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसमोर राहणार आहे. तरुण नेतृत्व, नव्या सीईओंचे प्रशासन आणि आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर झालेला हा बदल सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. आता डॉ. कोपुरवाड यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागाची वाटचाल कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





















