सोलापूर : महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने आज नवी पेठ आणि जुळे सोलापुरातील डी मार्ट परिसरात बेधडक कारवाई केली. नव्या पेठेत पाच हातगाड्या जप्त केल्या तर डी मार्ट परिसरात चार चाकी चार हातगाड्या, तीन खोके आणि दोन पत्रा शेड जेसीबीच्या साह्याने जागेवरच निष्काशीत करण्यात आले.
सोलापूर शहरात रस्त्यावर अडथळा ठरणारे आणि महापालिकेच्या जागेवर करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्याची मोहीम महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास मध्यवर्ती बाजार पेठ असलेल्या नवी पेठ येथे अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. या ठिकाणी चार चाकी पाच हातगड्या जप्त करण्यात आल्या. यावेळी येथील चार चाकी हात गाडीवाल्या व्यापाऱ्यांची मोठी धावपळ उडाली. अतिक्रमण विरोधी पथकाची गाडी पाहताच पथविक्रेते तसेच हात गाडीवाल्यांनी आपल्या गाड्या घेऊन पळ काढला. यामुळे नवी पेठेतील हा रस्ता मोकळा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आपली मोहीम जुळे सोलापुरातील डी मार्ट परिसराकडे वळवली. या परिसरात रस्त्यावर अडथळा ठरणारे अतिक्रमण हटविण्यात आले. या मोहिमेत चार चाकी चार हातगाड्या, तीन खोके, दोन पत्रा शेड जागेवरच जेसीबीच्या साह्याने निष्काशीत करण्यात आले. त्याचबरोबर दुकानासमोरचे कट्टे जमीन दोस्त करण्यात आली. जाहिरातीचे फलक जप्त करण्यात आले, अशी माहिती महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांनी दिली. कारवाई वेळी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबवण्यात आली.
विक्रेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर आपला व्यवसाय करू नये. रस्त्याला अडथळा आल्याचे दिसून आल्यास तातडीने कारवाई करण्यात येणार आहे. रस्त्याला अडथळा निर्माण होईल आणि सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण केल्यास जप्ती आणि इतर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांनी दिला आहे.





















