बार्शी – शहरातील आगामी जनगणना प्रक्रियेसाठी प्रशासकीय तयारीला वेग आला असून, मुख्याधिकारी तैमुर मुलाणी यांच्या उपस्थितीत प्रगणक व पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे. बार्शीतील सुलाखे हायस्कूल येथे २३, २४ व २५ एप्रिल या कालावधीत प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्याला प्रारंभ झाला.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार जनगणनेची प्राथमिक प्रक्रिया सुरु करण्यात आली असून, शहरासाठी एकूण १९६ प्रगणक, ३३ पर्यवेक्षक व २२ राखीव कर्मचारी अशी २५१ जणांची टीम तयार करण्यात आली आहे. या सर्वांना तीन टप्प्यांत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यासाठी १०० प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ९८ कर्मचारी प्रशिक्षणासाठी उपस्थित राहिले, तर अनुपस्थित राहिलेल्या दोन कर्मचाऱ्यांना मुख्याधिकारी तैमुर मुलाणी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
प्रशिक्षणाबाबत माहिती देताना मुख्याधिकारी तैमुर मुलाणी यांनी सांगितले की, प्रशिक्षणाचे तीन टप्पे नियोजित केले असून पहिला टप्पा २३ ते २५ एप्रिल, दुसरा टप्पा २७ ते २९ एप्रिल आणि अंतिम टप्पा ४ ते ६ मे दरम्यान पार पडणार आहे. या माध्यमातून सर्व २५१ कर्मचाऱ्यांना जनगणनेचे सविस्तर प्रशिक्षण दिले जाणार आहे.
जनगणना प्रक्रियेविषयी नागरिकांना माहिती देताना त्यांनी सांगितले की, १ मे ते १५ मे दरम्यान जनगणनेची रुपरेषा निश्चित केली जाईल. त्यानंतर १६ मे ते १४ जून या कालावधीत प्रगणक घरोघरी भेट देऊन घरांची व इमारतींची नोंदणी करतील. या काळात नागरिकांनी अचूक व संपूर्ण माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
देशाच्या विकासासाठी आणि भविष्यातील नियोजनासाठी जनगणनेतील माहिती अत्यंत महत्त्वाची ठरते. पायाभूत सुविधा, विविध योजना आणि विकासकामे यासाठी ही माहिती आधारभूत ठरत असल्याने नागरिकांनी जबाबदारीने सहभाग नोंदवावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.
या प्रशिक्षण शिबिरास उपमुख्याधिकारी राजाराम नरोटे, सुलाखे हायस्कूलचे प्राचार्य रामकृष्ण इंगळे, उपप्राचार्य प्रसन्न देशपांडे तसेच प्रशिक्षण अधिकारी वैभव पायगुडे, शुभम गुजर, संजय इंगोले व पवन परिहार उपस्थित होते.
























