बार्शी – येथे श्री भगवंत महोत्सव २०२६ अंतर्गत ‘The Folk आख्यान’ या कार्यक्रमाने सांस्कृतिक वैभवाचा भव्य आविष्कार साकारला. तब्बल ८५ पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि लोककलेच्या सादरीकरणातून उपस्थित प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. डीजे आणि रिमिक्सच्या युगात पारंपरिक लोकसंगीताचा ठेका अनुभवण्यासाठी नागरिकांनी भगवंत मैदानावर मोठ्या संख्येने हजेरी लावली आणि कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष दिपक वैद्य, नगराध्यक्षा तेजस्विनी कथले, अक्कलकोटचे नगराध्यक्ष मिलींद कल्याणशेट्टी, भाजपा नेते मल्हार पाटील, दिग्विजय बागल, पृथ्वीराज माने, रणवीर राऊत, उपनगराध्यक्ष रोहित पाटील, पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, आख्यान प्रमुख हर्ष कथले, नगरसेवक शाहूराजे निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी ‘गोपाळा रे गोपाळा…’, ‘राधे राधे…’, ‘हे माय पंढरी उभी राही…’, ‘विठू रखुमाई…’ अशा पारंपरिक अभंग आणि लोकगीतांच्या सादरीकरणावर तरुण-तरुणी, महिला आणि नागरिकांनी ठेका धरत जल्लोष केला. हलगी, ढोल, ताशा, झांज, खंजिरी, बासरी यासारख्या वाद्यांच्या गजराने संपूर्ण परिसर भारावून गेला. हलगीच्या नादाने हृदयाची धडधड वाढते, मग डीजेची गरजच काय? असा सूर उपस्थितांमधून उमटला.
स्वराज्य, शिवचरित्र आणि मराठी अस्मितेवर आधारित सादरीकरणांनी विशेष दाद मिळवली. “उधळी गुलाल माझ्या शिवबा-शंभूच्या नावाने…” अशा घोषणांनी वातावरण देशभक्ती आणि अभिमानाने दुमदुमून गेले.
यावेळी बोलताना रणवीर राऊत यांनी सांगितले की, २०१८ पासून सुरू झालेल्या भगवंत महोत्सवात युवकांना जाणीवपूर्वक संधी दिली जात आहे. यंदाचा संपूर्ण कार्यक्रम युवकांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या सहभागातून उभा केला आहे. महोत्सवासाठी सुमारे १ ते सव्वा कोटी रुपयांचे बजेट निश्चित करण्यात आले असून, दानशूर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वर्गणी दिल्याची माहिती त्यांनी दिली.
मल्हार पाटील यांनी ‘The Folk आख्यान’चे कौतुक करताना सांगितले की, ‘हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने संस्कृती जपणारा उपक्रम असून, यात तरुण आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.’
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीधर कांबळे यांनी केले, तर भगवंत देवस्थानचे सरपंच दादा बुडख यांनी “जगाचा लोकोत्सव – भगवंत लोकोत्सव” या संकल्पनेविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन मंगेश दहीहांडे यांनी केले.


























