सांगोला – एखतपुर (ता.सांगोला) येथील अमोल आमुने हा धावपटू सध्या सांगोला महाविद्यालयात बी.ए. तृतीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक धावण्याच्या स्पर्धांमध्ये त्याने बक्षिसे मिळवली आहेत. ऑलम्पिकला जाण्याची त्याची इच्छा आहे, परंतु परिस्थिती नसल्यामुळे त्याला रनिंगसाठी आवश्यक असलेले गार्मीन वॉच, स्पोर्ट शूज तो घेऊ शकत नव्हता. अमोल बाबर यांच्या मदतीने त्याने आपुलकी प्रतिष्ठानशी संपर्क साधला.
आपुलकीच्या पुढाकारातून प्रा.महामुनी यांचे सक्सेस क्लासेस त्याचबरोबर समाजातील दानशूर व्यक्तीकडून २१ हजार ५०५ व सांगोला महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राचार्य, सेवानिवृत्त प्राध्यापक, कर्मचारी यांच्या सहकार्यातून २५ हजार असे एकूण ४६ हजार ५०५ रुपये २४ तासात देणगी जमा झाली होती. त्यातून त्याला रनिंगसाठी आवश्यक असलेले २४ हजार ९०० रुपयांचे गार्मिन वॉच घेऊन देण्यात आले तर शूज साठी २१ हजार ६०५ रुपयाचा धनादेश संस्था सहसचिव साहेबराव ढेकळे, सदस्य सुरेश फुले यांच्या हस्ते प्राचार्य डॉ.सुरेश भोसले, आपुलकीचे अध्यक्ष राजेंद्र यादव यांच्या उपस्थितीत देण्यात आला. तसेच त्याला वैयक्तिक मासिक खर्चासाठी दरमहा ६ हजार रुपये देण्याची जबाबदारी आपुलकीचे सदस्य शशिकांत येलपले यांनी स्वीकारली.
प्रास्ताविक प्रा.डॉ.विधिन कांबळे यांनी केले. या प्रसंगी अमोल आमुने याने मनोगतात मिळालेली देणगी लाख मोलाची असून ती कायम स्मरणात राहील तसेच आगामी विविध स्पर्धामध्ये घवघवीत यश संपादन करू आणि सांगोला तालुक्याचे नाव उज्वल करू असा आत्मविश्वास व्यक्त केला.


























