सांगोला – गौडवाडी, बुद्धेहाळ, राजुरी, नाझरे आणि नराळे या पाच ग्रामपंचायतींना बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत नविन ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी प्रत्येकी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी दिली.
ग्रामपंचायत प्रशासनाचा कार्यभार व्यवस्थित पार पाडण्यासाठी ग्रामपंचायतींना नवीन इमारतीची आवश्यकता होती. याबाबत राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी ग्रामपंचायतींना इमारत बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा ही मागणी अधिवेशनापूर्वी केली होती. या मागणीची दखल घेत मंत्री गोरे यांनी तत्काळ या ग्रामपंचायतींना बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत निधी मंजूर केला आहे. निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी आभार मानले.
























