जेऊर – यशाची जिद्द आणि कष्टाची जोड असेल, तर परिस्थितीवर मात करता येते, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. यंदाच्या ‘राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती’ (NMMS) परीक्षेच्या निकालात राज्यभर विक्रमी गुणांचा ‘कट-ऑफ’ लागल्याने अनेक मोठे शैक्षणिक गड या स्पर्धेत कोलमडले असे असताना रावगावच्या पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालयाने मात्र आपला यशाचा झेंडा अभिमानाने उंच फडकवला आहे. तालुक्यात उत्तम प्रकारचा निकाल नोंदवत या शाळेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर शिक्कामोर्तब केले आहे.
या परीक्षेसाठी विद्यालयातील एकूण ११ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ९ विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवून ‘पात्रता’ सिद्ध केली होती . यातील दोन रत्नांनी थेट जिल्हा गुणवत्ता यादीत धडक मारली आहे. पृथ्वीराज विनोद बाबर याने प्रवर्गातून जिल्ह्यात २३ वा क्रमांक पटकावत आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली, तर कु. श्रावणी उन्मेश राख हिने प्रवर्गातून जिल्ह्यात ३ रा क्रमांक मिळवत आकाशाला गवसणी घातली. या दोन ताऱ्यांनी मिळवलेले हे यश केवळ त्यांचे वैयक्तिक यश नसून, ते संपूर्ण रावगावच्या शैक्षणिक चळवळीचे यश मानले जात आहे.
विशेष म्हणजे, यंदाचे मेरिट ऐतिहासिकरीत्या उच्च लागल्याने स्पर्धा अत्यंत चुरशीची होती. यामध्ये शाळेचे आणखी चार विद्यार्थी केवळ काही गुणांच्या अत्यल्प फरकाने गुणवत्ता यादीत येण्यापासून हुकले आहेत. मेरिट लिस्टच्या इतक्या जवळ पोहोचून या विद्यार्थ्यांनी दिलेली ही झुंज, शाळेच्या दर्जेदार शिक्षणाची साक्ष देत आहे. जरी हे विद्यार्थी तांत्रिकदृष्ट्या यादीत नसले, तरी त्यांनी मिळवलेले गुण कोणत्याही गुणवत्ताधारक विद्यार्थ्यापेक्षा कमी नाहीत, अशा भावना पालकांनी व्यक्त केल्या आहेत.
विद्यालयाच्या या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एकनाथरावजी काकडे आणि भैय्यासाहेब काकडे यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे विशेष कौतुक केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेले हे यश कौतुकास्पद असून, विद्यालयाने गुणवत्तेची ही परंपरा अशीच जोपासावी, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. तसेच, विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय कोळेकर सर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतानाच, विद्यार्थ्यांची मेहनत आणि शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन शाळेत दररोज होणारे विशेष सराव वर्ग यामुळेच आज रावगावचे नाव जिल्ह्यात चमकले आहे,” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

























