सोलापूर : पुणे येथील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. शिवराज प्र. कदम जहागीरदार यांनी नीरा नरसिंहपूर (ता. इंदापूर) येथील श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थानला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी श्री नृसिंह मंदिरातील व्यवस्था आणि देवस्थानच्या वतीने सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
सध्या नीरा नरसिंहपूर येथे श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्टच्या वतीने नृसिंह जयंती व नवरात्र उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २२ एप्रिल ते २ मे या कालावधीत मंदिरात कीर्तन, प्रवचन, भजन, सुगम संगीत, भावगंध संगीत, शहनाई वादन, छबिना व काल्याचे कीर्तन असे विविध कार्यक्रम होत आहेत. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ॲड. शिवराज कदम यांनी देवस्थानला भेट दिली. त्यांच्या हस्ते मंदिरात विधीवत पूजा व अभिषेक करण्यात आला.
मंदिर परिसराची पाहणी केल्यानंतर देवस्थानच्या कामकाजाबद्दल त्यांनी गौरवपूर्ण उद्गार काढले. याप्रसंगी देवस्थानचे मुख्य विश्वस्त ज्ञानेश्वर अरगडे यांनी ॲड. शिवराज कदम जहागीरदार यांचा शाल, श्रीफळ आणि भगवान श्री नृसिंहाची प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. या भेटीदरम्यान देवस्थानचे विश्वस्त प्रकाश सुरू सर, विश्वस्त अभयकुमार वांकर यांच्यासह ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते.























