सांगोला – शहरातील ४० मुली व महिलांना एमएस-सीआयटीचे व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाणार असून यासाठीच्या अंदाजित खर्चाला सांगोला नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेने मान्यता दिली असून लवकरच पहिली बॅच सुरू होणार असल्याची माहिती लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा माने यांनी दिली.
नगरविकास शासन निर्णयानुसार महिला व बालकल्याणसाठी ५ टक्के निधी राखीव ठेवणेची तरतूद असून त्यानुसार सांगोला नगरपरिषदेच्या अंदाजपत्रकीय रकमेतून ५ टक्के निधी म्हणजेच एकूण १२ लाख १३ हजार ७३० रुपये इतका निधी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यानुसार सांगोला शहर हद्दीतील मुलींना व महिलांना आपल्या पायावर उभे करुन व्यवसायिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. याच शासन निर्णयाच्या आधारे सांगोला शहर हद्दीतील इच्छुक व पात्र असणाऱ्या पहिल्या ४० मुली व महिलांची नाव नोंदणी करुन घेवून त्यांना एमएस-सीआयटीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या एमएस-सीआयटी मध्ये विद्यार्थ्यांना ए.आय.टेक्नॉलॉजी, एम.एस.ऑफिस बेसिक, इंटरनेट, वेब डिझाइनिंग इत्यादीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सदर प्रशिक्षणासाठी अंदाजे खर्च होणारी रक्कम रू.२ लाख एवढ्या खर्चास सर्वसाधारण सभेने मान्यता दिली असून लवकरच प्रशिक्षणाची पहिली बॅच सुरू होणार आहे. अधिक माहितीसाठी ७९७२१००३६५, ९५०३९२१५०० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
-छायाताई मेटकरी, सभापती, महिला व बालकल्याण समिती


























