सोलापूर – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १६ वर्षांखालील मुलांच्या निमंत्रित साखळी क्रिकेट स्पर्धेत सोलापूरच्या खेळाडूंनी मैदान गाजवले आहे. ‘साऊथ झोन’ संघाकडून खेळताना कर्णधार पृथ्वीराज कणसे आणि गोलंदाज अनुज वाल्मिकी यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनने खेळाडूंसाठी सतत सराव सामने आयोजित केल्यामुळे या मुलांच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. या स्पर्धेत अजूनही दोन सामने शिल्लक असून, सोलापूरच्या या सुपुत्रांकडून अशाच मोठ्या कामगिरीची अपेक्षा क्रीडाप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.
———
पृथ्वीराजचा ३ सामन्यांत ३६० धावा
पृथ्वीराज याने फलंदाजीमध्ये सातत्य राखत प्रतिस्पर्धी संघांच्या गोलंदाजांचा समाचार घेतला आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ३ सामन्यांतील ५ डावांमध्ये २ शतके आणि १ अर्धशतक झळकावत एकूण ३६० धावा कुटल्या आहेत. मेट्रो संघाविरुद्ध १३० चेंडूत १२५ धावा (शतक), सेंट्रल झोनविरुद्ध १७० चेंडूत १६७ धावा (धडाकेबाज शतक) आणि सी.एन.ए. संघाविरुद्ध ११५ चेंडूत ५७ धावा (अर्धशतक).
——
अनुज वाल्मिकीचे ३ सामन्यांत २२ बळी
गोलंदाजीमध्ये अनुजने आपल्या फिरकीची जादू दाखवत प्रतिस्पर्धी संघांचे कंबरडे मोडले आहे. त्याने ३ सामन्यांच्या ५ डावांत तब्बल २२ बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक सामन्यात त्याने किमान ५ बळी घेण्याची किमया साधली आहे.
मेट्रो संघाविरुद्ध पहिल्या डावात ७ आणि दुसऱ्या डावात ३ बळी (एकाच सामन्यात १० बळी घेण्याचा विक्रम), सेंट्रल झोनविरुद्ध पहिल्या डावात ५ आणि दुसऱ्या डावात २ बळी, सी.एन.ए. संघाविरुद्ध ९७ धावांच्या बदल्यात ५ बळी.
























