पंढरपूर – शहारातील महत्त्वाच्या चौकामध्ये वाहनधारकांकडून वाहतुकीचे नियम पाळले जात नसल्यामुळे वारंवार वाहतूकीची कोंडी निर्माण होत आहे. या मध्ये भरीसभर म्हणून बेदरकारपणे वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांमुळे रोजच छोट्या,मोठ्या अपघाताला देखील निमंत्रण दिले जात असल्याचे गेल्या काही महिन्या पासून दिसून येत आहे. मात्र वाहतूक पोलिस हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहून देखील बेजबाबदार वाहनचालकांवर कोणतीच कारवाई करताना दिसत नाहीत ही माक्ष आश्चर्याची गोष्ट आहे.
शहरातील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय चौक, प्रबोधनकार ठाकरे चौक, अर्बंन बँक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, संतपेठ, सांगोला रस्ता चौक आदी महत्वाच्या परिसरात मोठमोठी दुकाने, रुग्णालये, हॉटेल, महाविद्यालय, मैदान आहेत. यामुळे या परिसरात दिवसरात्र रहदारी असते. चालत जाणाऱ्या लोकांसह, वाहनांची फार गर्दी असते. त्याचबरोबर मालवाहतूक, मुरूम, वाळू यांसारखी जड वाहतूक होते. तसेच, विद्यार्थी, वयोवृध्द नागरिक, महिला आणि मुलीही मोठ्या प्रमाणात दुचाकी व सायकलवर जा ये करीत असतात. त्या मध्येच सर्रास वाहनधारकांकडून वाहतुकीचे नियम पाळले जात नसल्यामुळे वारंवार वाहतूकीची कोंडी निर्माण होताना दिसत आहे. या बरोबरच बेदरकारपणे वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांमुळे रोजच छोटे,मोठ्या अपघाताच्या घटना देखील घडताना दिसत आहे. मात्र वाहतूक पोलिसांचे याकडे साफ दुर्लक्ष होते आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना शिस्त लावून शहरातील होणारी वाहतूक कोंडी तसेच छोट्या मोठ्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे शहरातील सुज्ञ नागरिकांतून बोलले जात आहे.
——————————
चौकट : ( वाहतूक पोलिस आणि परिवहन विभाग गंभीर नाही )
दरम्यान शहरातील महत्वाच्या चौकात वाहनधारकांकडून वाहन वळविताना चुकीच्या बाजूचा उपयोग केला जातो. परिणामी या ठिकाणी दोन्ही-तिन्ही बाजूने वाहने एकमेकांच्या वाहनासमोरच येतात. यामुळे वाहनाचे अपघात होतात. त्याचबरोबर वाहने समोरा थांबतात, यामुळे बऱ्याचदा वाहतुकीची कोंडी देखील होते. या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने वाहन वळविणाऱ्या वाहधारकांना दंड करणे किंवा शिस्त लावणे गरजेचे आहे. मोटार वाहन कायदा प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी परिवहन विभागाची आहे. शहरातील अवैध वाहतूक व होणारे अपघात पाहता परिवहन विभाग गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.
————————
चौकट : ( वारंवार वाहतूक कोंडीची प्रमुख ठिकाणे )
शहरातील गजानन महाराज मठ परिसर, संपुर्ण प्रदक्षिणा रस्ता, स्टेशन रोड, केबीपी काँलेज रस्ता, अहिल्यापुल रस्ता, तहसील कचेरी समोरील रस्ता, भक्तीमार्ग, अर्बंन बँक मुख्य शाखा रस्ता, भादुले चौक, नगरपालिका समोरील रस्ता, संतपेठ, सांगोला चौक रस्ता, गोपाळपूर रस्ता, विवेक वर्धिनी समोरील रस्ता, अंबाबाई पटांगण या शिवाय शहर परिसरातील इतर काही रस्त्यांवर देखील वाहतूकीची प्रचंड कोंडी होत आहे.
———————–
चौकट : ( स्वयंचलित सिंग्नल यंत्रणा बंद अवस्थेत )
नागरिकांच्या घामाच्या (कररुपातील ) पैशातून लाखो रुपये खर्चुन उभारण्यात आलेली स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातील स्वयंचलित सिंग्नल यंत्रणा देखील अनेक वर्षापासून बंद अवस्थेतच आहे. ही स्वयंचलित सिंग्नल यंत्रणा सुरु ठेवल्यास मुख्य सावरकर चौक, स्टेशन रस्ता येथील वाहतूकीला बऱ्या शिस्त लागण्यास मदत होईल.
———————
कोट
केबीपी कॉलेज चौक, ठाकरे चौक, लिंकरोड, संतपेठ, सांगोला चौक, भादुले चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक आदी महत्वाच्या चौकांमधून दररोज सकाळ पासून ते संध्याकाळपर्यंत वाहतुकीची सतत कोंडी असल्याचे मागील अनेक दिवसांपासून पाहत आहे. विशेषत: जड वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. वाहतूक कोंडीमुळे छोटे-मोठे अपघात होत आहेत. तसेच, यामुळे पादचारी देखील मरण पावले आहेत. तेथे वाहतूक पोलिसाची गरज आहे.
नागेश पाटील ( नागरिक )
————————
कोट
वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष झाल्यास वेळेचे अपव्यय तर होतोच; पण जीवदेखील जातात. कायदा पाळणे हे नागरिकांचे कर्तव्य असून, त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई व्हायलाच हवी. नियम मोडणे क्षणिक मजेची बाब असली, तरी त्यामुळे अपघाती मृत्यू होऊ शकतात. शहरातील बेशिस्त वाहतुकीचे चक्र तोडण्यासाठी पोलिसांची कठोर कारवाई व्हायला हवी.
दत्तात्रय जाधव ( ज्येष्ठ नागरिक )

























