सोलापूर : वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (डब्ल्यू.आय.टी.) सोलापूर येथील मेकॅनिकल अँड ऑटोमेशन इंजिनिअरिंग विभागाने संशोधन आणि नवोपक्रम क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत यशाचा आणखी एक मानाचा तुरा आपल्या शिरपेचात रोवला आहे. विभागातील संशोधकांनी विकसित केलेल्या “फूड कुकिंग अपॅरॅटस विथ वॉटर हीटिंग अरेंजमेंट” या अत्याधुनिक व उपयुक्त उपकरणाचे पेटंट प्रकाशित झाले आहे.
या संशोधनात डब्ल्यू.आय.टी.चे संशोधन व विकास अधिष्ठाता डॉ. श्रीशैलप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मेकॅनिकल अँड ऑटोमेशन इंजिनिअरिंग विभागप्रमुख डॉ. भाग्येश देशमुख यांच्यासह प्रा. ए. एन. सुरडे, प्रा. जी. बी. आगलावे, प्रा. जी. एन. सामलेती, प्रा. डी. डी. मसलेकर, प्रा. एन. के. कुलकर्णी, प्रा. वाय. एन. जंगले, प्रा. एस. एस. बिराजदार आणि प्रा. एस. एस. देशमुख यांनी मोलाचा सहभाग नोंदविला आहे.
या संशोधनामागील प्रमुख उद्दिष्ट म्हणजे स्वयंपाक प्रक्रिया अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि ऊर्जा-बचत करणारी बनविणे होय. पारंपरिक पद्धतीत उष्णतेचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असताना, या नवकल्पनेत अन्न शिजवताना निर्माण होणारी उष्णता पाणी गरम करण्यासाठी उपयोगात आणण्याची अभिनव यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे उष्णतेचा पुनर्वापर साध्य होऊन इंधन व ऊर्जेची लक्षणीय बचत होण्यास मदत होते. ऊर्जा वाचते, खर्च कमी होतो आणि पर्यावरणालाही हातभार लागतो.
घरगुती वापर, लघुउद्योग, कॅन्टीन, ग्रामीण भागातील स्वयंपाक व्यवस्था तसेच सामुदायिक भोजन प्रकल्पांसाठी हे उपकरण अत्यंत उपयुक्त ठरण्याची दाट शक्यता आहे. ऊर्जा कार्यक्षमतेसह पर्यावरणपूरक दृष्टीकोन जपत, हे संशोधन शाश्वत विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकते.
या पेटंट प्रकाशनामुळे विभागातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या संशोधन क्षमतेला नवे बळ मिळाले असून, संस्थेच्या उद्योगाभिमुख व समाजोपयोगी संशोधन परंपरेला अधिक चालना मिळाली आहे. नवकल्पना रुजते, संशोधन फुलते आणि समाजहित साध्य होते, या ध्येयाने संस्था सातत्याने पुढे जात आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ. रणजित गांधी, विश्वस्त वैभव गांधी, भूषण शहा, पराग शहा, प्राचार्य डॉ. सचिन गेंगजे तसेच सर्व प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. भविष्यातही अशाच समाजोपयोगी आणि परिणामकारक संशोधन प्रकल्पांना चालना देण्याचा संस्थेचा निर्धार यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाला आहे.



























