सोलापूर – राज्यातील नवीन संचमान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन सुरू असल्याने आगामी ‘पवित्र’ पोर्टल शिक्षक भरतीमध्ये रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे ३१ मे २०२६ पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांच्या जागांचाही समावेश करून १०० टक्के पदभरती करावी, अशी मागणी विविध शिक्षक संघटनांनी केली आहे.
शिवयुनिट, शिक्षक एकता संघटना तसेच युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि महापालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांची भेट घेऊन रिक्त पदांबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यात आली.
प्राथमिक शिक्षण विभागात मे अखेरपर्यंत सुमारे ४२० शिक्षक पदे जाहिरातीत समाविष्ट होण्याची शक्यता असून, माध्यमिक विभागात इयत्ता पाचवी ते दहावीसाठी सुमारे ३९० पदे उपलब्ध होऊ शकतात, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यामध्ये कला, क्रीडा, कार्यानुभव तसेच बीएससी-बीएड प्रवर्गातील पदांचे प्रमाण अधिक असणार असल्याचे सांगण्यात आले.
कन्नड व उर्दू माध्यमासाठी मात्र एकही रिक्त पद उपलब्ध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्या ठिकाणी अतिरिक्त शिक्षकांची संख्या जास्त असल्याने भरतीची आवश्यकता नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. खासगी अनुदानित शाळांमध्येही अतिरिक्त शिक्षकांमुळे रिक्त पदे नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सध्या शिक्षक समायोजन आणि रोस्टर तपासणीची प्रक्रिया सुरू असून, ३१ मे २०२६ पर्यंत अधिकृत आकडेवारी स्पष्ट होईल. त्यानंतर ‘पवित्र’ पोर्टलवर जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले.
राज्य उपाध्यक्ष प्रशांत शिरगुर यांनी सांगितले की, “नवीन संचमान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांचे प्रमाण वाढल्याने रिक्त जागा कमी होण्याची शक्यता आहे. मात्र मेअखेरपर्यंतच्या सर्व सेवानिवृत्त जागांचा समावेश केल्यास भरतीतील पदसंख्या वाढू शकते. मागासवर्गीय आणि इतर आरक्षण प्रवर्गातील अनुशेष भरून काढण्यासाठी सर्व रिक्त पदे तात्काळ ‘पवित्र’ पोर्टलवर प्रसिद्ध करावीत. प्रशासनाने बिंदूनामावली अद्ययावत करून अपलोड करणे आवश्यक आहे.
अभियोग्यताधारक अजय पवार यांनीही चिंता व्यक्त करताना सांगितले की, “अंतिम संचमान्यतेनुसार जर जागा कमी आल्या किंवा अतिरिक्त शिक्षकांमुळे भरती मर्यादित झाली, तर अनेक उमेदवारांना रोजगारासाठी इतर जिल्ह्यांत जावे लागेल. स्थानिक पात्र उमेदवारांना आपल्या जिल्ह्यातच रोजगार मिळावा, यासाठी रिक्त पदांची संख्या वाढविणे गरजेचे आहे.
दरम्यान, शिक्षक भरतीसाठी पात्र उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने कमी पदभरतीमुळे हजारो भावी शिक्षकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


























