
सोलापूर – अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी पुण्याहून निघालेली भर वेगातील मारुती सुझुकी कार समोरील धावत्या माल ट्रकला पाठीमागून धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात एका दीड वर्षाच्या बाळासह दोन सख्या बहिणी ठार तर ड्रायव्हर सह त्याची पत्नी जखमी झाल्याची घटना सोलापूर – पुणे महामार्गावर कोंडी शिवारात आज सोमवारी सकाळी सव्वा सहा वाजता घडली. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की अपघात ग्रस्त मोटार कारचा अक्षरशा चेंदामेंदा झाला होता . त्यामुळे आतील मृतदेह ओढा ओढ करून बाहेर काढावी लागली .
सिंधू रवि खंडागळे (वय ४२वर्ष) आणि त्यांची बहिण नंदा भाऊराव हाताळकर (वय ४५ वर्ष, दोघे रा. पिंपरी चिंचवड, पुणे) अशी जागीच ठार झालेल्या सख्या बहिणींची नावे असून रुद्राक्ष उमेश मोरे ( वय दीड वर्ष ) असे अश्विनी दवाखान्यात उपचारादरम्यान मयत झालेल्या बालकाचे नाव आहे . तर रुद्राक्षची आई साक्षी मोरे हिला अश्विनी दवाखान्यात व वडील उमेश प्रकाश मोरे (वय ३३, रा. पिंपरी चिंचवड, पुणे) यास येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील सर्व मयत व जखमी हे पुणे येथील देहू रोड वरील रहिवासी आहेत .
पुणे जिल्ह्यातील देहुरोड येथील उमेश मोरे आणि नातेवाईक हे तुळजापूर, अक्कलकोटला दर्शनासाठी मारुती सुझुकी कार (एम एच 12 एन जे – 9942 ) निघाले होते. सदर सुझुकी कार आज सोमवारी सकाळी मोहोळ सोलापूर मार्गे निघाली असताना समोरील माल ट्रक ( क्र एम एच -38 एक्स -1121 ) ला पाठीमागून जोरदार धडकली .हा अपघात इतका भीषण होता की कारचा पुढचा भाग पूर्ण चेंदामेंदा झाला.यात वरील पाचही जण मार लागून गंभीर जखमी झाले तर दोन बहिणी जागेवर मयत झाल्या . कार पुढील भाग चेंदामेंदा झाल्यामुळे मृतांना ओढून बाहेर काढावे लागले. टोलनाक्यावरील रुग्णवाहिकेव्दारे दोघा बहिणींना व उमेश मोरे यांना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे डॉक्टरांनी दोघा बहिणींना मृत घोषित केले तर कार चालक उमेश यांची पत्नी साक्षी व मुलगा रुद्राक्ष यांना अश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले .मात्र उपचारादरम्यान थोड्याच वेळात रुद्राक्ष चा मृत्यू झाला .
दरम्यान घटनेची माहिती पुण्यातील नातेवाईकांना समजताच नातेवाईकांनी दुपारपर्यंत येथील शासकीय रुग्णालयात धाव घेत आक्रोश व्यक्त केला .
या अपघाता प्रकरणी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती .















