बार्शी – शहरातील मलिक चौक परिसरात किरकोळ कारणावरून दोन युवकांना दगड, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तिघांविरोधात बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.
उबेद शहानवाज तांबोळी (वय 18, रा. बालाजी कॉलनी, सोलापूर रोड, बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. 15 मे 2026 रोजी रात्री सुमारे 9 वाजता ते व त्यांचा मित्र साईम शाहीद सय्यद हे दोघेजण नेहमीप्रमाणे क्षीरसागर टर्फ येथे क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते. क्रिकेट खेळून परत येत असताना रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास परांडा रोडवरील मलिक चौकाजवळील अजिंठा कलेक्शन समोर ही घटना घडली.
फिर्यादी उबेद तांबोळी हे इलेक्ट्रिक दुचाकी चालवत असताना पाठीमागून आवाज दिल्याने त्यांनी गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. त्यावेळी रेहान बाबुडे व यासिर तुटके (दोघे रा. बारंगुळे प्लॉट, बार्शी) हे दोघे त्यांच्या जवळ आले. “तू आम्हाला कट का मारलास?” असा जाब विचारत त्यांनी उबेद तांबोळी व त्यांचा मित्र साईम सय्यद यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
यानंतर आरोपींनी त्यांचा मित्र शोएब मिर्झा (रा. मेहदी नगर, बार्शी) याला घटनास्थळी बोलावून घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, फिर्यादी व त्यांचा मित्र “आम्ही कट मारलेला नाही” असे सांगत असतानाही आरोपींनी पुन्हा मारहाण केली. यावेळी रेहान बाबुडे याने जवळील दगड उचलून उबेद यांच्या पाठीवर तसेच साईम सय्यद यांच्या बरगडीवर मारून जखमी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तसेच तिघांनी शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पीडित युवकांच्या आरडाओरडीनंतर अमन जिकरे, रिजवान तांबोळी व इतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत भांडण सोडविल्याचे सांगण्यात आले.
घटनेनंतर जखमी युवकांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात येऊन ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेतले. त्यानंतर उशिराने गुरुवार दि. २१ मे रोजी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.