अक्कलकोट – महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमेवरील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र माशाळ येथील श्री चौडेश्वरी देवीची १५ दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता शनिवारी एक लाख भाविकांच्या उपस्थितीत कड़ी जत्री (शेवटची यात्रा) भव्य-दिव्य विविध कार्यक्रमाने झाली. विशेष म्हणजे घोड्याचा खेळ व पाखरं मारण्याचा खेळ अप्रतिम सादर केले असल्यामुळे भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे.
शनिवारी तब्बल १२ तास चाललेल्या सवाद्य मिरवणुकीत कर्नाटकसह महाराष्ट्रामधील असंख्य भाविक भक्तिभावाने सहभागी झाले होते. या यात्रेत सुमारे एक लाखाहून अधिक भाविकांनी पदस्पर्श दर्शन घेतले. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, अरुणकुमार पाटील, नितीन गुत्तेदार, वैजनाथ निंगदळी, राजकुमार पाटील, मंदिर समितीचे अध्यक्ष गुंडप्पा कुंभार, उपाध्यक्ष चंद्राम कुंभार, सिद्धप्पा कुंभार, नानासाहेब पाटील, सुरेश रँका, शिवण्णा पारगोंडा, श्यामराव प्रधानी, जी. एम. कोरबू, अभिषेक पाटील, विश्वनाथ रेवूर, हणमंत बारामणी, शिवानंद प्याटी, धुळाप्पा राजा, मल्लिनाथ गडेद, शिवरुद्रप्पा अवटगी, खासिमसाब पिंजार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी या उत्सवाला पहाटे श्री च्या आरतीनंतर मंगलमय वातावरणाने सुरुवात झाली. कडी जत्रेच्या पहाटे पाच वाजल्यापासूनच श्रीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली असल्यामुळे दिवसभर मोठी रांग लागली होती. देवस्थानाच्या गाभाऱ्यास विविध आकर्षक पुष्पमालेनी सुशोभित करण्यात आले होते. त्यानंतर सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सप्तरंगांच्या फुलांनी सुशोभित करण्यात आलेल्या श्रींचे पूजन मुख्य पुजारी धुंडप्पा कुंभार, चंद्राम कुंभार परिवार व मान्यवरांच्या हस्ते करुन मार्गस्थ झाली. विशेषतः दिवसभरात सुमारे अकरा हजारहून अधिक भाविकांनी श्री देवीला सप्तरंगी बाशिंग अर्पण करुन दर्शन घेतले. मिरवणुकीसमोर अनेक मशाल दिवे, ढोल संघ, बंड पथक, हलगीचा निनाद, ताशांचा कडकडाट, टाळ व सनईच्या मधुर आवाजाने सारे वातावरण भक्तिमय झाले होते. यावेळी डिजिटल फटाक्यांसह दारु गोळ्यांची आतषबाजीसह टाळ्यांचा, शिट्यांचा वर्षाव व श्री च्या जयजयकाराने संपूर्ण माशाळ शहर व परिसर दुमदुमून गेले होते. परगावहून आलेल्या भाविकांसाठी मंदिर पंच कमिटी व दानशूर व्यक्तींनी श्री हनुमान मंदिर व मंगल कार्यालयात सराफ व्यापारी शिवकुमार डांगे, व पंच कमिटी यांच्यावतीने हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी सहा वाजता मुख्य चौकात मिरवणूक आल्यानंतर अनेक मानकरी परिवाराच्यावतीने पारंपारिक पद्धतीने बाशिंग अर्पण करून ओटी भरण्यात आली. त्यानंतर शांतप्पा हडपद यांनी घोड्याचा खेळ सादर करून उपस्थितांना डोलायला तर हणमंत हगार यांनी पाखर मारण्याचा खेळ सादर करून उपस्थितांची मने जिंकली. शेवटी मंदिरात रात्री महामंगलारतीने सोहळ्याची सांगता करण्यात आली. यावेळी पंचरत्न आरती ओवाळण्यासाठी व नैवेद्य दाखविण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. या सोहळ्याचे सूत्रसंचालन नागप्पा बारामनी यांनी केले. रविवारी सायंकाळी मल्लांच्या जंगी कुस्ती स्पर्धेने उत्सवाची सांगता झाली.
अफजलपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनिंग वडेर यांनी चोख बंदोबस्त ठेवले होते.
सर्वधर्मसमभाव दर्शन – श्रीक्षेत्र माशाळ येथील चौडेश्वरी देवीची यात्रा हा एक आगळा वेगळा उत्सव आहे. प्राचीन काळापासून गावातील मुस्लीम समाज बांधवासह प्रत्येक समाजासाठी देवीची विशेष सेवा करण्याचा मान आहे. अशी प्रथा इतर कोठेही पाहायला मिळत नाही. ज्या दिवशी देवी बीजाला स्पर्श करते, त्या दिवशी शेतकरी बिया घेऊन पेरणी करतात. आईच्या आशीर्वादाने चांगले पीक मिळेल. भाकणूक मुदकन्ना हुगार यांनी भाकणूक सांगताना यंदाच्या वर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगितले. आणि भक्ती सोबतच ग्रामीण कलांचे अनावरण हे या जत्रेचे वैशिष्ट्य असल्याचे मत यात्रा समितीचे मुख्य समन्वयक श्यामराव प्रधानी यांनी संचार शी बोलताना सांगितले.