सोलापूर : जनगणना ही देशाच्या विकास नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून प्रत्येक नागरिकाने योग्य माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे. घरगणना करताना प्रगणक व पर्यवेक्षक नागरिकांच्या घरी भेट देत असल्याने त्यांना आवश्यक माहिती वेळेत उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले.
भारत सरकारच्या जनगणना २०२७ अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात सुरू असलेल्या घर यादी व घरगणना कामाचा आढावा घेण्यासाठी आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे व उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी आशिष लोकरे यांनी विविध चार्जची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी त्यांनी संबंधित चार्जमधील प्रगणक व पर्यवेक्षक यांच्याशी संवाद साधून घरगणना करताना येणाऱ्या अडचणी, तांत्रिक समस्या तसेच नागरिकांकडून मिळणारे सहकार्य याबाबत माहिती घेतली. घरगणना प्रक्रिया अचूक व सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. प्रगणक व पर्यवेक्षकांना येणाऱ्या अडचणींचे तात्काळ निराकरण करण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या पाहणी दौऱ्यावेळी संबंधित चार्ज अधिकारी अविनाश वाघमारे, राघवेंद्र गायधनकर, जनगणना मुख्य कार्यालयातील कनिष्ठ अभियंता आशिष घुले , संदीप भोसले व आदिनाथ कांबळे यांच्यासह इतर चार्ज अधिकारी, प्रगणक व पर्यवेक्षक उपस्थित होते.
नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य
करावे : उपायुक्त आशिष लोकरे
उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी आशिष लोकरे यांनी प्रगणक व पर्यवेक्षकांना काम अचूक, पारदर्शक व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांनी कोणतीही भीती अथवा गैरसमज न बाळगता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
Post Views: 24