
सोलापूर – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांची सदिच्छा भेट घेत, समाजकल्याण विभागाच्या सभापती संस्कृती सातपुते यांनी सामाजिक आणि पर्यावरणीय प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. या बैठकीत वृक्षारोपण मोहीम आणि शालेय स्तरावर ‘गुड टच- बॅड टच’ जनजागृती उपक्रम राबविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. यामुळे सोलापूर जिल्ह्यात पर्यावरण संवर्धन आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसारख्या संवेदनशील विषयांवर आता प्रशासन स्तरावर ठोस पावले उचलली जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
दरम्यान, या बैठकीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनासाठी दीर्घकालीन आराखडा तयार करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. वाढते तापमान, घटणारे हरित क्षेत्र आणि पर्यावरणीय असंतुलन लक्षात घेता ग्रामपातळीवर व्यापक वृक्षलागवड मोहिम राबविण्याबाबत विशेष बैठक आयोजित करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती समोर आली.
यासोबतच शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने ‘गुड टच- बॅड टच’ या विषयावर जनजागृती करणे काळाची गरज असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींमध्ये सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्शाबाबत जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी शाळांमध्ये विशेष मार्गदर्शन सत्रे, कार्यशाळा आणि पालक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
दरम्यान, यावर मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी या दोन्ही विषयांबाबत सकारात्मक भूमिका घेत प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. पर्यावरण संवर्धन आणि बालसुरक्षा या विषयांना केवळ औपचारिकता न ठेवता प्रत्यक्ष कृती आराखड्याच्या माध्यमातून गती देण्याचा प्रयत्न होणार असल्याचे संकेत या बैठकीतून देण्यात आले. जिल्हा परिषद प्रशासनाकडून सामाजिक जाणीव आणि विकासात्मक उपक्रमांना प्राधान्य दिले जात असल्याने आगामी काळात जिल्ह्यात विविध जनजागृती मोहिमा अधिक प्रभावीपणे राबवल्या जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Post Views: 12