
सोलापूर – विजय ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत अत्यंत चुरशीच्या आणि रोमांचक लढतीत मॉडेल क्रिकेट अकॅडमीने उत्कृष्ट अष्टपैलू खेळाच्या जोरावर ‘जय हिंद कुर्डूवाडी’ संघाचा ३० धावांनी पराभव करत दिमाखात विजय साजरा केला.
येथील इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर झालेल्या दोन्ही संघांमधील हा सामना शेवटच्या षटकापर्यंत कमालीचा उत्कंठावर्धक ठरला. मोक्याच्या क्षणी गोलंदाजी आणि फलंदाजीत दाखवलेल्या सातत्यामुळे मॉडेलने बाजी मारली. प्रथम फलंदाजी करताना मॉडेलने निर्धारित ४० षटकांत ९ गड्यांच्या मोबदल्यात २६३ धावांचा डोंगर उभा केला. मॉडेलकडून फलंदाजीत ययाती देवकते याने ६४ चेंडूत ५६ धावांची आणि यश गोपाल याने ४७ चेंडूत ५५ धावांची उत्कृष्ट अर्धशतकी खेळी करत संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले.
प्रत्युत्तरात, २६४ धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या जय हिंद कुर्डूवाडी संघाकडून अभिजित मुळे याने ४५ चेंडूत ४५ धावांची आक्रमक खेळी करत चिवट झुंज दिली. मात्र, नियमित अंतराने विकेट्स पडत गेल्याने कुर्डूवाडीचा डाव ३९.५ षटकांत २३३ धावांवरच आटोपला.
जय हिंद कुर्डूवाडी संघ जेव्हा वेगाने धावा जमवत सामना आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा मॉडेलचा हुकमी एक्का संस्कार गवळी याने आपल्या भेदक गोलंदाजीने सामन्याचे चित्र पलटवले. ययाती आणि यशने रचलेल्या धावसंख्येच्या पायावर संस्कारने अचूक मारा करत कुर्डूवाडीच्या मधल्या फळीला खिंडार पाडले, जो सामन्याचा मुख्य टर्निंग पॉईंट ठरला.
या सामन्याचा खरा शिल्पकार ठरलेला अष्टपैलू संस्कार गवळी याने फलंदाजीत ४४ चेंडूत ३४ धावांचे मोलाचे योगदान दिले. तर गोलंदाजीत कमालीची कामगिरी करत ८ षटकांत १ निर्धाव षटकासह अवघ्या ४१ धावा देऊन ४ महत्त्वपूर्ण बळी टिपले. या अष्टपैलू कामगिरीसाठी संस्कार गवळीला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून घोषित करण्यात आले.























