
सोलापूर : राज्य निमंत्रित खो-खो स्पर्धेत रत्नागिरीने पुण्याला रोखले. कबड्डी स्पर्धेत सांगली आणि बारामती संघांने शानदार विजय मिळविले.
नार्थकोट प्रशालेच्या मैदानावर हिंदू धर्मरक्षिणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती महामंडळ यांच्या वतीने ही स्पर्धा सोलापूर जिल्हा कबड्डी व खो-खो असोसिएशन आणि उत्कर्ष क्रीडा मंडळ यांच्या सहकार्याने आयोजित केली आहे.
खो-खोमध्ये शुक्रवारी दोन सामने बरोबरीत झाले. रत्नागिरीच्या आर्यन स्पोर्ट्सने पुण्याच्या राजमाता जिजाऊ क्रीडा मंडळ १९-१९ असे बरोबरीत रोखले. अत्यंत चूरशीचा झालेला हा सामना मध्यंतरासही ८-८ असा बरोबरीत होता. पुण्याकडून प्रियांका इंगळे(३.००, २.०० मिनिटे व १० गुण) व रत्नागिरीच्या ऐश्वर्या सावंत (१. ३०, १. ५० मिनिटे व ४ गुण) यांनी अष्टपैलू खेळी केली.
अन्य एका सामन्यात ठाण्याच्या दोन संघातच अटीतटीची लढत झाली. नाईक संघाने ८-९ अशा पिछाडीवरून शिवभक्त क्रीडा मंडळास १५-१५ असे बरोबरीत रोखले. नाईक संघाकडून पूजा फरगडे(१.१० व ४ गुण) व शिवभक्त संघाकडून दिव्या गायकवाड (१. १० व २. २०मिनिटे संरक्षण) यांची खेळी प्रेक्षणीय ठरली
अन्य निकाल : ज्ञानविकास ठाणे विजयी विरुद्ध राजमाता पुणे २२-१८. शिवभक्त बदलापूर ठाणे विजयी विरुद्ध राजमाता अहिल्यादेवी सांगली १७-१३. शिवभक्त बदलापूर ठाणे विजयी विरुद्ध अध्यक्षीय संघ सोलापूर २१-१०. छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळ धाराशिव विजयी विरुद्ध राजमाता अहिल्यादेवी सांगली १३-९ एक डाव राखून.
आर्यन स्पोर्ट्स रत्नागिरी विजयी विरुद्ध नाईक ठाणे १९-१८ एक मिनिटे राखून.
————————-
कबड्डी : सांगली आणि बारामती संघांचे शानदार विजय
कबड्डीच्या स्पर्धेतील सामन्यात प्रोग्रेस कबड्डी संघ सांगली विरुद्ध सोलापूर महिला संघ यांच्यात लढत झाली. या सामन्यात प्रोग्रेस सांगली संघाने पहिल्या डावात ३१ आणि दुसऱ्या डावात २३ असे एकूण ५४ गुण मिळवले. तर सोलापूर महिला संघाला पहिल्या डावात ०३ आणि दुसऱ्या डावात २४ असे एकूण २७ गुणच मिळवता आले. परिणामी, प्रोग्रेस सांगली संघाने २७ गुणांच्या फरकाने हा सामना जिंकला. या सामन्यात सांगलीकडून अल्ली महाडिक तर सोलापूरकडून कीर्ती माने हिने उत्कृष्ट चढाईचे प्रदर्शन केले.
’ब’ गटात झालेला दुसरा सामना बारामती अकॅडमी विरुद्ध विश्वशांती क्रीडा मंडळ, मुंबई शहर यांच्यात पार पडला. या सामन्यात बारामती अकॅडमीने उत्कृष्ट खेळ करत पहिल्या डावात २६ आणि दुसऱ्या डावात २३ असे एकूण ४९ गुण पटकावले. मुंबई शहर संघाला पहिल्या डावात ०९ आणि दुसऱ्या डावात ०८ असे एकूण १७ गुणच मिळवता आले. बारामती अकॅडमीने ३२ गुणांच्या मोठ्या फरकाने सामन्यात विजय मिळवला. बारामती संघाकडून मिनाक्षी घाटगे हिने उत्कृष्ट चढाई आणि वैशली झगडे हिने उत्कृष्ट पकड केली. मुंबई संघाकडून सुमित्रा कांबळे हिने उत्कृष्ट चढाई तर रोझनी डिसोजा हिने उत्कृष्ट पकड केली.





















