टेंभुर्णी – माढा तालुक्याच्या पश्चिम भागातील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण झाली असून टेंभुर्णी–अकलूज (रांजणी, भिमानगर, आलेगाव बु., रुई, आलेगाव खुर्द, गार अकोले, बावडा मार्गे) या नव्या एसटी बससेवेचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. या बससेवेच्या प्रारंभामुळे पश्चिम भागातील विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या उद्घाटन प्रसंगी शिवसेना पक्षाचे उपनेते व माजी खासदार राहुल शेवाळे, राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे, माजी आमदार शहाजीबापू पाटील, माढा लोकसभा संपर्कप्रमुख तथा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आणि या बससेवेसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे शिवसेना नेते संजय (बाबा) कोकाटे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते एसटी बसची पूजा करून हिरवा झेंडा दाखवत बससेवेचा शुभारंभ करण्यात आला.
पश्चिम भागातील नागरिकांचे शैक्षणिक, व्यावसायिक व दैनंदिन व्यवहार प्रामुख्याने अकलूज, टेंभुर्णी, पानीव आणि सराटी या भागांशी संबंधित आहेत. मात्र या परिसरात नियमित सार्वजनिक वाहतुकीची सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः विद्यार्थी, महिला आणि वयोवृद्ध नागरिकांना प्रवासासाठी खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे या मार्गावर एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती.
लोकांच्या सातत्यपूर्ण मागणीची दखल घेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुमारे दोन महिन्यांपूर्वी विशेष बाब म्हणून ही बससेवा सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र रांजणी-भिमानगर ते गार अकोले या मार्गावरील रस्त्याचे काम सुरू असल्याने व अनेक ठिकाणी खोदकाम झाल्यामुळे बससेवा तातडीने सुरू होऊ शकली नव्हती. अलीकडेच रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर परिवहन विभागाने आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून ही बससेवा सुरू केली.
या बससेवेबाबत परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, दीर्घकाळ प्रलंबित असलेली मागणी पूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन गरजा, शिक्षण, आरोग्य व रोजगाराच्या दृष्टीने ही बससेवा अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना संजय (बाबा) कोकाटे यांनी सांगितले की, शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यात येत असून, त्यांच्या मार्गदर्शनामुळेच पश्चिम भागातील नागरिकांची ही महत्त्वाची मागणी पूर्ण झाली आहे.
बससेवेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
– सकाळी ९.०० वाजता – टेंभुर्णी ते अकलूज
– सकाळी ११.०० वाजता – अकलूज ते टेंभुर्णी
– दुपारी ४.०० वाजता – टेंभुर्णी ते अकलूज
– सायंकाळी ६.०० वाजता – अकलूज ते टेंभुर्णी
या नव्या बससेवेमुळे पश्चिम भागातील गावांचा टेंभुर्णी व अकलूजशी थेट संपर्क प्रस्थापित झाला असून शिक्षण, आरोग्य, व्यापार व दैनंदिन प्रवासासाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे या निर्णयाचे परिसरातील नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.
Post Views: 4