अक्कलकोट : सलग सुट्ट्या, अधिक मास आणि धार्मिक उत्सवांच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र अक्कलकोट येथे गेल्या महिनाभरापासून स्वामी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर परिसरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या गर्दीमुळे दर्शन व्यवस्थेवर ताण येत असून, भक्तांकडून मंदिर परिसरातील सुविधांमध्ये सुधारणा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे राज्यासह परराज्य आणि परदेशातूनही हजारो भाविक दररोज दर्शनासाठी अक्कलकोटमध्ये येत आहेत. विशेषतः सलग सुट्ट्यांच्या कालावधीत मंदिर परिसरात प्रचंड गर्दी होत असल्याने भाविकांना दर्शनासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे. काही ठिकाणी गर्दीचे प्रमाण इतके वाढत आहे की, चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याची चिंता भाविकांनी व्यक्त केली आहे.
सध्या अक्कलकोट नगरपरिषदेच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत विविध विकासकामे सुरू आहेत. मात्र, श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर आणि समाधी मठ परिसरातील पारंपरिक व मर्यादित जागेमुळे दर्शन व्यवस्थापनात अडचणी निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. भविष्यात भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता मंदिर परिसरातील अंतर्गत सुविधा आणि व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे मत अनेक भक्तांनी व्यक्त केले आहे.
भाविकांच्या मते, राज्यातील शिर्डी, तुळजापूर, पंढरपूर आणि शेगाव येथील मंदिरांप्रमाणे आधुनिक आणि नियोजनबद्ध दर्शन व्यवस्था अक्कलकोटमध्येही विकसित करण्यात यावी. स्थानिक आणि बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी स्वतंत्र रांगा, सुयोग्य मार्गदर्शन केंद्रे, प्रतीक्षागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले जात आहे.
तसेच, भक्तांशी सौजन्याने वागणारे प्रशिक्षित सेवेकरी आणि कर्मचारी नियुक्त करणे, त्यांच्या मदतीसाठी पोलीस प्रशासनाचा समन्वय वाढविणे आणि गर्दी व्यवस्थापनासाठी तज्ज्ञ संस्थांची मदत घेणेही आवश्यक असल्याची मागणी पुढे येत आहे. विशेषतः दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि महिला भाविकांसाठी स्वतंत्र व सुलभ दर्शन व्यवस्था उभारण्यावर भर देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
वाढत्या भाविकसंख्येच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित, सुसूत्र आणि भक्ताभिमुख दर्शन व्यवस्था निर्माण करण्यासाठी मंदिर समितीने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी स्वामी भक्तांकडून करण्यात येत आहे. अक्कलकोट हे देशभरातील स्वामी भक्तांचे प्रमुख श्रद्धास्थान असल्याने भविष्यातील गरजा लक्षात घेऊन दीर्घकालीन नियोजन करणे काळाची गरज असल्याचे मत भाविकांनी व्यक्त केले आहे.
Post Views: 7