सोलापूर : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील प्रियदर्शनी सभागृहात दिनांक ४ ते ६ जून या कालावधीत तीन दिवसीय निवासी “हिंदु धर्म-संस्कार शिबिर” आयोजित करण्यात आले आहे. सोलापूर, लातूर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांतील शेकडो धर्मप्रेमी युवक-युवती या शिबिरात सहभागी होणार असून, त्यांच्या मनात धर्माभिमान, राष्ट्रनिष्ठा, चारित्र्यसंपन्नता आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना दृढ करण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरास सनातन संस्थेच्या संत सद्गुरु स्वाती खाडये तसेच पूजनीय दीपाली मतकर यांची विशेष उपस्थिती आणि मार्गदर्शन लाभणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून साधना, धर्माचरण आणि आदर्श जीवनमूल्यांविषयी प्रेरणादायी विचार ऐकण्याची संधी मिळणार आहे. शिबिरामध्ये धर्मशिक्षण वर्गाचे एकूण सात भाग शिकवले जाणार असून, हिंदु धर्माची तत्त्वे, भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये, धर्माचरणाचे महत्त्व, राष्ट्रनिष्ठा, आदर्श व्यक्तिमत्त्व विकास आणि कुटुंबव्यवस्थेतील संस्कार यांविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच समर्थ रामदास स्वामी आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगांद्वारे युवकांमध्ये नेतृत्वगुण, धैर्य, चारित्र्य आणि राष्ट्रसेवेची भावना जागृत करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
याशिवाय शौर्य जागृतीसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण, भारतीय गुरुकुल शिक्षण व्यवस्थेचा गौरवशाली इतिहास व तिचे महत्त्व, तसेच सध्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय घडामोडींविषयी जागृतीपर सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. युवकांना वैचारिकदृष्ट्या सक्षम, संस्कारित आणि राष्ट्रकार्यासाठी प्रेरित करणे हा या शिबिराचा प्रमुख उद्देश आहे.
शिबिरातील सहभागींसाठी भोजन आणि निवासाची व्यवस्था करण्यात आली असून, समितीच्या वतीने जास्तीतजास्त संख्येने शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. शिबिरात सहभागी होण्यासाठी ९७६२७२१३०४ या क्रमांकावर संपर्क करावा. शिबिरामुळे सहभागी युवक-युवतींना धर्म, संस्कार, स्वसंरक्षण आणि राष्ट्रसेवा यांचा समन्वय साधत आदर्श जीवन जगण्याची प्रेरणा मिळणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.






















