सोलापूर – येथील डोणगाव रस्त्यावरील पुष्प जिमखाना मैदानावर सुरू असलेल्या ‘निलेश गायकवाड अकॅडमी इंटर क्लब क्रिकेट टूर्नामेंट’मध्ये चौथ्या दिवशी अटीतटीचे सामने पाहायला मिळाले. पहिल्या सत्रात ‘ईगल्स’ने लॉयन्स’वर ७ धावांनी निसटता विजय मिळवला, तर दुपारच्या सत्रात ‘रायडर्स’ने ‘एमबी चॅलेंजर्स’चा ९५ धावांनी धुव्वा उडवला.
पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ‘ईगल्स’चा डाव २३.४ षटकांत सर्वबाद १५९ धावांवर आटोपला. यामध्ये श्रवण म्हेत्रे आणि ऋग्वेद पाटील (४७ धावा) यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. त्यांना अनुज मुंदडा (२२) आणि पृथ्वीराज खोडवे (नाबाद १२) यांनी सुरेख साथ दिली. ‘लॉयन्स’कडून गोलंदाजी करताना सुरज थोरातने अवघ्या १७ धावांत ३ बळी घेत ईगल्सच्या धावसंख्येला ब्रेक लावला. आर्यन भूमकर आणि गणेश पवार यांनी प्रत्येकी दोन, तर सार्थक कन्नाने १ बळी घेतला.
१६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ‘लॉयन्स’चा संघ विजयाच्या उंबरठ्यावर असताना २४.२ षटकांत १५२ धावांवर सर्वबाद झाला. सुजल गायकवाड (३७), हर्ष राऊत (३४) आणि सार्थक कन्ना (३०) यांनी खिंड लढवली, मात्र इतर फलंदाज अपयशी ठरले. ईगल्सच्या आर्यन हंगेने २१ धावांत ३ बळी आणि गौरव गाडेकरने ९ धावांत २ बळी घेत सामन्याचा पासा पलटवला. सोहम कुलकर्णी, अनुज वाल्मिकी, ऋग्वेद पाटील व चेतन मांडूलो यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. एनजीसीए ईगल्सने हा सामना ७ धावांनी जिंकला. सामनावीर ऋग्वेद पाटील, उत्कृष्ट फलंदाज: श्रवण म्हेत्रे व उत्कृष्ट गोलंदाज: सुरज थोरात ठरला.
दुपारच्या सत्रात ‘रायडर्स’ विरुद्ध ‘एमबी चॅलेंजर्स’ यांच्यात सामना रंगला. प्रथम फलंदाजी करताना रायडर्सने निर्धारित २० षटकांत ५ बाद १६४ धावांचा मजबूत धावसंख्या उभारली. अनिष बिरोळीने ३६ धावा, व्यंकटेश घाडगेने २२ धावा आणि पूर्णचंद्रने १८ धावांचे योगदान दिले. एमबी चॅलेंजर्सकडून अभिषेक खोबरेने २ बळी, तर सिद्धार्थ कुंसी, वाहक मोमीन व फारुख यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
१६५ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना ‘एमबी चॅलेंजर्स’चा डाव रायडर्सच्या भेदक माऱ्यापुढे अवघ्या ६९ धावांवर पत्त्यांसारखा कोसळला. चॅलेंजर्सकडून केवळ तनुष नाईक (१० धावा) आणि मोहम्मद पटेल (४ धावा) काहीसा प्रतिकार करू शकले. रायडर्सच्या अथर्व हलकुरकीने ११ धावांत ३ बळी आणि अभिराज कापसेने २० धावांत ३ बळी घेत चॅलेंजर्सची दाणादाण उडवली. स्वप्नील चव्हाण, शिवम घोरपडे व संस्कार घोरपडे यांनी प्रत्येकी १ बळी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले. एनजीसीए रायडर्सने ९५ धावांनी मोठा विजय नोंदवला.
सामनावीर अथर्व हलकुरकी, उत्कृष्ट फलंदाज अनिष बिरोळी व उत्कृष्ट गोलंदाज अभिराज कापसे ठरला.

























